बेस्टच्या अपघातात आईसह ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

रस्ता ओलांडत असताना बेस्ट बसच्या धडकेत आईसह ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यु झाल्याची घटना शीव कोळीवाडा येथे दुपारी घडली. याप्रकरणी शीव पोलिसांनी बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ट पोलीस निरीक्षक मनोज हिर्लेकर यांनी दिली.

औषधोपचार करून निघाले आणि अपघातात ठार झाले

सावित्री वरुण (२५) आणि धनवीर (७) असे अपघातात ठार झालेल्या मायलेकराचे नाव आहे. सावित्री ही पती दीपक (३२) मुलगा धनवीर सह अन्टाॅप हिल येथे राहण्यास होती. सोमवारी सकाळी सावित्री ही मुलाला सर्दी ताप असल्यामुळे त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय येथे घेऊन आली होती. दुपारी औषधोपचार करून दोघे मायलेक पायी चालत घराकडे जाण्यास निघाले होते, दरम्यान  शीव कोळीवाडा चौक डोमिनोज पिझ्झा सेंटर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या बेस्ट बस रूट क्रमांक ३४१ (ए) या बसने दोघांना धडक दिली. भीषण अपघातात आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले, त्यांना तात्काळ लोकमान्य टिळक रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच शीव पोलीसानी अपघातस्थळी धाव घेऊन बेस्ट बस कंत्राटी चालक गुरुप्रसाद जैस्वाल (४५)याला ताब्यात घेण्यात आले. शीव पोलीस ठाण्यात निष्कळजी आणि बेदरकारपणे वाहन चालवून आई आणि मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज हिर्लेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here