70 वर्षीय आईच्या मरणानंतर केली इच्छा पूर्ण आणि केले अवयवदान

आपल्या 70 वर्षीय आईच्या इच्छेचा मान राखत तिच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिच्या अवयवांचे अवयवदान केले. या निर्णयाने नव्या अवयवासाठी प्रतीक्षेत असलेल्या चार जणांना जीवनदान मिळाले. मुंबई आणि नजीकच्या परिसरात यंदाच्या वर्षांत केवळ चारवेळाच सत्तरीतील वृद्धांकडून मरणानंतर अवयवदान केले. त्यामुळे ठाण्यातील 70 वर्षीय महिलेने केलेल्या अवयवदानामुळे अवयवदानाच्या चळवळीतून नवा संदेश पोहोचला आहे.

गेल्या शनिवारी या वृद्ध महिलेची तब्येत अचानक ढासळली. सतत उलट्या होत असल्याने वृद्ध महिलेला तिच्या मुली आणि जावयाने ठाण्यातील नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला ब्रेन हेमरेज झाल्याचे निदान केले. उपचारांसाठी तातडीने महिलेला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तिला डॉक्टरांनी मेंदू मृत घोषित केले. रुग्ण मेंदू मृत झाल्यानंतर अवयवदान करता येते, अशी माहिती मिळताच कुटुंबीयांनी महिलेच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.

(हेही वाचा – Mumbai Traffic: वाहतूक कोंडीत मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर!)

मरणानंतर शरीरातील जे अवयव दान करता येतील ते जरूर करा, अशी विनंती आईने केली होती. आईच्या विनंतीचा आम्ही मान राखला, असे मृत महिलेच्या मुलीने सांगितले. वयाच्या मर्यादेमुळे आम्हांला फुफ्फुस आणि हृदय दान करता आले नाही. मात्र यकृत आणि दोन मूत्रपिंडे, उत्तीपेशी आणि दोन्ही डोळे दान केल्याने मुंबई व महानगर परिसरातील 28 वे अवयवदान पार पडले. अवयवदान हे चांगले सामाजिक कार्य आहे. मरणानंतर गरजूना नवे आयुष्य मिळते, याचे समाधान आम्हाला वाटते अशी माहिती वृद्ध महिलेच्या मुलीने दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here