दि. २६ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुरबाडचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम कथोरे यांना मानवंदना दिली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळयास पुष्पचक्र अर्पण करून दहा वाजता आमदार कथोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर आणि संस्थेचे प्रतिनिधी देवेंद्र गंध्रे यांनी संयुक्तपणे किसनजी कथोरे यांचे पुष्पगुच्छ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा, मानचिन्ह आणि पुस्तक भेट देऊन स्वागत केले. यावेळी आमदार कथोरे यांनी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केलेल्या छानदार संचलनाचे निरिक्षण केले. शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना शाळेच्या कामकाजाचा आढावा सादर केला आणि उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कथोरे यांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले.
( हेही वाचा: कोविड-19 साथीनंतरच्या काळात ‘थायरॉइड आय डिसीज’चा प्रसार चिंताजनक )
ही बाब माझ्यासाठी अभिमानाची
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कथोरे म्हणाले की ही शाळा उत्तम आणि सुजाण नागरिक घडविण्याचे काम करत आहे. शालेय शिक्षणासोबत देशभक्तीचे धडे इथे मुलं शिकतात आणि देशभक्तीची ओढ असलेला विद्यार्थी या शाळेत घडतो आणि ते माझ्या मतदार संघात होत आहे. ही खूप आनंदाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे.
शाळेचे काही विद्यार्थी देशाच्या सेनादलात देशसेवा करत आहेत ही आम्हा सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित असलेले अग्नीवीर हे अशाच शाळांमधून तयार होतील, असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणात कथोरे पुढे म्हणाले की महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, ही शाळा माझ्या मतदारसंघात आहे याचा मला अभिमान आहे. स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात सैनिकी शाळेच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला याचा खूप आनंद झाला असेही कथोरे म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार विद्यार्थ्यांनी आता पासूनच अंगी बाणले पाहिजेत आणि आपण त्यांच्या सैनिकी करणाच्या विचाराने ते शालेय शिक्षणासोबत या शाळेत शिकत आहात, ही देशसेवाच आहे असेही आमदार कथोरे पुढे म्हणाले.
आमदार कथोरे यांनी शाळेच्या प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. आमदार कथोरे यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना पारितोषिके देखील देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी छानदार संचलन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक व विविध प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये योगा, मल्लखांब, कराटे, बाँक्सींग, लेझीम, ऑबस्टँकल, रिंगफायर, एम एम एस फॉरमेशन, इ प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उपस्थितांनी विद्यार्थ्याच्या साहसी प्रात्यक्षिकांना उत्स्फुर्त दाद दिली. दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार कथोरे यांच्या समवेत सुरेश बांगर, अनिल घरत, अजित घरत संस्थेचे पदाधिकारी देवेंद्र गंध्रे आणि चित्रा सावरकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग, पालक, माजी विद्यार्थी, पत्रकार इ.मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देसले आणि इयत्ता नववीचा विद्यार्थी प्रज्ञहर्ष डोळस यांनी केले.
Join Our WhatsApp Community