एका मोठ्या गुलामीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले असून, आपला देश प्रजासत्ताक असावा आणि लोकांनी निवडलेले प्रतिनिधी त्यात असावेत, एक न्यायपालिका असावी असा विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देशभक्तांनी व्यक्त केला आणि यातूनच त्यांनी या देशाच्या प्रजासत्ताकासाठी योगदान दिले. आपल्या देशाला एक सांस्कृतिक इतिहास असून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विभाजनकारी तत्त्वांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आणि देशभर भ्रमंती करून क्रांति करून समाजाला जागृत करण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन मुंबई विभागाचे आयकर आयुक्त अनिल कुमार मिस्रा यांनी प्रजासत्ताक दिनी बोलताना केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताकदिनाचा समारंभ दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा केला गेला. यावेळी झालेल्या ध्वजावतरण कार्यक्रमाला अनिल कुमार मिस्रा प्रमुख अतिथी होते. विशेष पाहुणे म्हणून न्यूज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर, स्मारक सदस्य के. सरस्वती, दीपक कानुलकर, डॉ. अनिल नाबर हेही उपस्थित होते.
वीर सावरकरांच्या मुल्यांना आत्मसात करा
मिस्रा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे काँग्रेसमध्ये सहभागी होऊन सत्तेत येऊ शकले असते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यांनी देशसेवेसाठी जीवन समर्पित केले. त्यामुळेच त्यांच्या विचारांना, मूल्यांना आत्मसात केले तर देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहील आणि देश अधिक शक्तिशाली होईल.
( हेही वाचा: पुढील ३ महिन्यात ३० हजार शिक्षक भरती होणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती )
सावरकरांच्या विचारांना आदर्श मानू
या कार्यक्रमात बोलताना न्यू १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी सांगितले की, पत्रकार म्हणून प्रसारमाध्यमात काम करताना वीर सावरकर यांचा अपमान होऊ नये, याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. त्यांच्या क्रांतिकारी विचारांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत राहू. सावरकर हे आपल्या सर्वांच्या हृदयातील भारतरत्न असून त्यांच्या विचारांना आदर्श मानून त्यांच्या विचारांवर आपण पुढे चाललो तर निश्चितच आपला देश एक चांगला प्रजासत्ताक होईल.
Join Our WhatsApp Community