नातवंड सांभाळायच्या वयात ती सांभाळत होती… ड्रग्सचा धंदा! कोण आहे ती?

मागील ९ वर्षांपासून या धंद्यात असणाऱ्या जोहराबाईला या धंद्यातील खडानखडा माहिती असून, तिने चरस विक्रीसाठी काही माणसे सुद्धा ठेवली आहेत.

184

खरं तर तिचे वय नातवंडांना सांभाळायचे, त्यांच्यासोबत खेळायचे, त्यांना गोष्टी सांगायचे आहे, मात्र तिने बहिणीचा ड्रगच्या धंद्याची सूत्रं हाती घेऊन सोबत या वयात ती ड्रग्सचा धंदा सांभाळत होती. जोहराबाई शेख वय वर्ष ७५ राहणार वांद्रे, ही महिला अखेर पोलिसांच्या कचाट्यात चांगलीच अडकली. जोहराबाईला आणि तिच्या एका साथीदाराला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुमारे सव्वा कोटींच्या ‘चरस’ या अंमली पदार्थासह अटक केली आहे.

असा रचला सापळा

पश्चिम उपनगरातील वांद्रे पश्चिम येथील चिंचवाडी येथे हॉटेल चायना जवळ असणाऱ्या एका पिंपळाच्या झाडाखाली, एक इसम ‘चरस’ या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ७चे प्रभारी पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने रविवारी सदर ठिकाणी सापळा रचून किशोर गवळी याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ पोलिसांना ‘मनाली चरस’ चे काही गोळे सापडले. त्याच्याकडे कसून चौकशी करताच त्याने हे चरस आपण जोहराबाईच्या सांगण्यावरुन विकत असल्याचे पोलिसांना सांगितले.

(हेही वाचाः डार्कनेटः ड्रग माफियांचा ऑनलाइन अड्डा! अशी आहे ड्रग्सची ऑनलाइन बाजारपेठ)

घरात सापडले दीड कोटींचे चरस

पोलिसांनी जोहराबाई शेख हिच्या वांद्रे येथील वॉटर फिल्ड रोड, येथील झोपडीवजा चाळीत छापा मारला. तिच्या घराची झडती घेतली असता, घराच्या कानाकोपऱ्यात दडवून ठेवलेला सुमारे ३ किलो ९६० ग्रॅम मनाली चरसचा साठा पोलिसांना मिळाला. या चरसची किंमत साधारण सव्वा कोटींच्या घरात असल्याची माहिती पोलिस अधिकारी श्रीधनकर यांनी दिली. ७५ वर्षांच्या जोहराबाई शेख हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

9 वर्षे करत होती व्यवसाय

जोहराबाई हिला दोन मुले असून, मुलाचे वांद्रे येथेच ब्युटिकचे दुकान आहे. जोहराबाई हिची बहीण पूर्वीपासून अंमली पदार्थांचा व्यवसाय करत होती. ९ वर्षांपूर्वी बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर अंमली पदार्थाच्या धंद्याची संपूर्ण जबाबदारी जोहराबाई हिने सांभाळली. मागील ९ वर्षांपासून या धंद्यात असणाऱ्या जोहराबाईला या धंद्यातील खडानखडा माहिती असून, तिने चरस विक्रीसाठी काही माणसे सुद्धा ठेवली आहेत. ही माणसे मुंबईतील छोट्या ड्रग्स विक्रेत्यांना चरस पुरवण्याचे काम करतात.

(हेही वाचाः डॅडींच्या दगडी चाळीचा ‘इतिहास’! (भाग-1))

कोण आणून देते ड्रग्स?

जोहराबाई हा चरस राज्याबाहेरुन मागवत होती, मात्र ड्रग्स तिच्यापर्यंत कसे पोहचायचे, हे मात्र तिने अद्याप पोलिसांना सांगितलेले नाही. पोलिस तिच्याकडे याबाबत कसून चौकशी करत आहेत. जोहराबाई शेख आणि किशोर गवळी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने २६ मे पर्यंत दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.