देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरात 1028 ग्रामपंचायती आणि 75 हजार जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी एकत्रितपणे राष्ट्रगीताचे गायन केले. देशाप्रती आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
( हेही वाचा : 2 महिन्यांच्या आजारपणानंतर मुख्यमंत्री आले जनतेसमोर! केली ‘ही’ घोषणा… )
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त जिल्ह्यात एकाच वेळी राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतल जाधव, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सरपंच गणेश पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, मुख्याध्यापक दादासाहेब गाडे, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा वेश परिधान केला होता.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’
1 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यात एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मैदानावर मानवी साखळी करून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साकारला. सोबतच भारताचा नकाशा तयार करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण जनजागृती मोहीम
जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे जिल्हा परिषदेतील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची वसुंधरादूत म्हणून निवड केली जाईल. यातून पर्यावरणाबाबत जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, संस्कृती यासंबंधी विविध विषयांचे ज्ञान देणार असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community