क्रांतिवीर बाबाराव सावरकरांचा ७७ वा स्मृतिदिन

126

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वडील बंधू बाबाराव सावरकर! बाबारावांनी आपल्या लहान भावाला गुरु मानले. लहान भावाचा अनुयायी होण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. आपल्या भावाचा सशस्त्र क्रांतीचा मार्ग सुकर व्हावा म्हणून वाट्याला आलेल्या हालअपेष्टा, यातना, दुःख , संकटे, छळ, यांना ते आनंदाने सामोरे गेले. स्वातंत्र्यवीर विलायतेला गेल्यावर हिंदुस्थानातल्या कार्याचा भार बाबारावांनी सांभाळला.

महात्मा गांधींच्या राजकीय विचारांच्या गोंधळात सापडलेल्या हिंदू समाजाला दिशा देण्याचा बाबारावांनी प्रयत्न केला. मुसलमानांचा अनुनय हा राष्ट्रहिताला मारक ठरत होता. अफगाणिस्तानच्या अमीराला हिंदुस्तानवर स्वारी करण्यासाठी गांधींनी निमंत्रण देण्याचा घाट घातला आहे हे कळताच बाबारावांनी त्याला कडाडून विरोध केला. स्वराष्ट्रापेक्षा, स्वधर्मापेक्षा कोणतीही व्यक्ती महान नाही. महान व्यक्तीच्या चुकांवर पांघरूण घालून तिचा उदोउदो करणारी आंधळी व्यक्तिपूजा करण्याचा वेडेपणा बाबारावांनी केला नाही आणि इतरांना करू दिला नाही.

(हेही वाचा – बाबाराव सावरकरांचे ‘ते’ म्हणणे गांधींनी ऐकले असते, तर भगतसिंह-राजगुरू फासावर गेले नसते.)

राष्ट्राभिमानाची परंपरा जीवापाड जपणारे बाबाराव 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तुलनेत बाबारावांचे विचार आणि आचार अधिक जहाल वाटतात. बाबारावांची भाषा सुद्धा वीर सावरकरांच्या ज्येष्ठ भावाची साक्ष पटवणारी आहे. बाबाराव साध्यासरळ स्वभावाचे होते. त्यांचा प्रांजळपणा हा गुण वाखाणण्याजोगा होता. त्याचबरोबर अवघड प्रसंगात त्यांनी दाखवलेले चातुर्य आणि त्यावर सहज केलेली मात त्यांच्यातल्या नेतृत्वगुणाची साक्ष देते. राष्ट्रधर्माला बाधा आणणारी व्यक्ती, तत्त्वे यांचा समाचार घेताना त्यांच्यातली कठोरता प्रचितीला येते. इतिहासातल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही याकडे बाबाराव यांचा कटाक्ष होता. श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीशिवाजी आणि क्षात्रतेजाने तळपणारे पूर्वज यांचाच मार्ग बाबारावांनी अनुसरला होता. पौरुषत्वाची, आत्मसन्मानाची, राष्ट्राभिमानाची परंपरा अखेरच्या श्वासापर्यंत बाबारावांनी जीवापाड जपली.

क्रांतिकारकाचा बाबारावांचा पिंड 

बाबारावांचा पिंड क्रांतिकारकाचा होता. वर्ष १९२२ नंतर हातात लेखणी घेतली. त्याआधी आणि त्यानंतरही त्यांनी बॉम्ब , पिस्तुल या शस्त्रांना अंतर दिले नाही. औरंगजेबाच्या मशिदीवर आक्रमण करायला तरुणांना उद्युक्त करणारे बाबारावच होते. रेल्वेगाडीत अरेरावी करणाऱ्या पठाणाची दाढी उपटणारे बाबाराव सावरकरच होते. नागपूरच्या मिरवणुकीत आजारी असतानाही हातात शस्त्र घेऊन मिरवणुकीत सहभागी होणारे सुद्धा बाबारावच होते. अंदमानात आणि अन्य कारागृहात बाबारावांचा जेवढा छळ करण्यात आला तेवढा छळ अन्य कोणत्याही क्रांतिकारकाचा करण्यात आला नाही. बाबारावांना सातत्याने विजेचा शॉक देण्यात आला होता. पण कोणत्याही छळाला कंटाळून त्यांनी आपला देशस्वातंत्र्याचा सशस्त्रक्रांतिचा मार्ग टाकला नाही. अशा या भारतमातेच्या वीर पुत्राला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

(व्याख्याते आणि लेखक – दुर्गेश जयवंत परुळकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.