- दा. कृ. सोमण
भारताची इस्रो ही संस्था लवकरच गगनयानातून भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवून अंतराळ संशोधनातील नवे दालन खुले करणार आहे. भारताचे राकेश शर्मा हे सोविएत युनियनमधून त्या देशाच्या अंतराळवीरांबरोबर अंतराळात गेले होते. आता भारताच्या भूमीवरून ‘गगनयान’ लवकरच अंतराळवीरांना घेऊन अंतराळात जाणार आहे. या मोहिमेमुळे भारत हा जगातील मानवाला अंतराळात पाठविणारा चौथा देश ठरणार आहे. गगनयान मोहिमेचे नेतृत्त्व विंग कमांडर शुभांशू शुक्ला करणार आहेत. (78th Independence Day)
१२ एप्रिल १९७५ रोजी भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट’ हा सोविएत युनियनच्या मदतीने यशस्वीपणे अंतराळात पाठविण्यात आला. ३ एप्रिल १९८४ रोजी सोविएत युनियनच्या अवकाशवीरांसह भारताच्या राकेश शर्मा यांनी प्रथमच अवकाशात यशस्वी उड्डाण केले. रॅाकेटमध्ये भारताने छान प्रगती केली. चांद्रयान-१ चे प्रक्षेपण सतीश धवन केंद्रातून २२ ॲाक्टोबर २००८ रोजी झाले. ८ नोव्हेंबर २००८ रोजी ते चंद्रकक्षेत पोहोचले. या मोहिमेत भारताचा तिरंगा ध्वज चांद्रभूमीवर रोवला गेला. चांद्रयान-१ चे दुसरे महत्त्वाचे यश म्हणजे चंद्रावर गोठलेल्या स्थितीत पाणी असल्याचे पुरावे या मोहिमेद्वारे जगाला दिले. मंगळयान-१ चे यश तर खूप मोठे होते. मंगळयान-१ चे प्रक्षेपण ५ नोव्हेंबर २०१३ रोजी सतीश धवन केंद्रावरून झाले. एकाच रॅाकेटद्वारे १०४ उपग्रह अंतराळात पाठविण्याचा विक्रम १५ फेब्रुवारी २०१७ रोजी इस्रोने केला. त्यापूर्वी २०१४ मध्ये ३७ उपग्रह अंतराळात पाठविण्याचा रशियाचा विक्रम होता. २२ जुलै २०१९ रोजी सतीश धवन केंद्रावरून चांद्रयान-२ ने यशस्वी उड्डाण केले. ते चंद्रकक्षेत पोहोचले परंतू चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरू शकले नाही. २०२३ मध्ये इस्रोने चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरविले. चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यशस्वीपणे यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.
(हेही वाचा – Independence Day: स्वातंत्र्य दिनानिमित्त हाय अलर्ट! दिल्ली, पंजाबमध्ये आत्मघाती हल्ल्याची माहिती)
गगनयान मोहीम
गगनयान मोहीम ही भारतीय अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. कारण या मोहिमेत प्रथमच भारतीय अंतराळवीर भारत भूमीवरून अंतराळात जाऊन, तेथे प्रयोग करून परत भारतीय सागरात सुखरूप उतरणार आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीचे रॅाकेट आणि मॅाड्यूल्स या मोहिमेत वापरण्यात येत आहेत. कमीत कमी खर्चात ही मोहीम कार्य करणार आहे. भारताची ही क्षमता भारताच्या संरक्षण खात्यालाही उपयुक्त ठरणार आहे.
गगनयान मोहिमेसाठी अनेक चाचण्या घेण्यात येत आहेत. सुरक्षितता हा महत्त्वाचा भाग असतो. गगनयानात ॲार्बिटल मॉड्यूल आणि क्रू मॉड्यूल असणार आहेत. लो अर्थ ॲार्बिट मध्ये म्हणजे ४०० किलोमीटर उंचीवर ३ दिवस हे यान अंतराळात भ्रमण करणार आहे. ५३०० टनांची कॅप्सुल घेऊन एलव्हीएम-३ रॅाकेट अंतराळात उड्डाण करेल. बंगळुरूमध्ये ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटर ( HSFC) नावाचे नवीन केंद्र सुरू केले आहे. तेथेही अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू झालेले आहे. या प्रशिक्षणात ग्लासकॅासमॅास ही रशियन संस्था तांत्रिक सहाय्य करीत आहे.
आत्तापर्यंतच्या सर्व मोहिमांमधील इस्रोची ही सर्वात महागडी आणि जोखमीची अशी ही मोहीम असेल. इथे अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे गगनयान मोहीमेतील प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली जात आहे आणि एलएमव्ही-३ रॅाकेटच्याही चाचण्या घेतल्या जात आहेत. पृथ्वीवर परत येणारी की-एंट्री स्पेस कॅप्सुल, पॅड अबॅार्ट चाचणी, रॅाकेट प्रक्षेपण अयशस्वी झाल्यास किंवा त्यामध्ये काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांनी सुरक्षित बाहेर पडणे, डिफेन्स बायोइंजिनियरिंग ॲन्ड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरीने तयार केलेला अंतराळवीरांचा पोशाख या सर्वांची चाचणी झालेली आहे.
गगनयानातील क्रू मॅाड्यूल आणि सर्व्हिस मॅाड्यूल यांचे एकत्रित वजन जवळ जवळ आठ टन असेल. हिंदुस्थान एरोनॅाटिकल लिमिटेड या कंपनीने क्रू मॅाड्यूल तयार केले आहे. गगनयानाला त्याच्या ठरविलेल्या निर्धारित कक्षेत पोहोचविण्याची जबाबदारी ही सर्व्हिस मॅाड्यूलमध्ये असलेल्या प्रपल्शन सिस्टीमकडे असेल. मोहीम पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस मॅाड्यूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. यामध्ये पाच लिक्विड अपोजी मोटर्स आहेत. या मोहिमेसाठी अंतराळवीरांना अंतराळात खाता येईल असे खाद्यपदार्थ, किरणोत्सार मोजणारी उपकरणे, पॅराशूटस् आणि औषधे डीआरडीओ पुरवीत आहे. (78th Independence Day)
गगनयान मोहिमेच्या नियंत्रणासाठी ॲास्ट्रेलियातील कोकोज या बेटांवर एक तात्पुरता तळ उभारण्यात आला आहे. अंतराळवीरांच्या तीन दिवसांच्या अंतराळातील मुक्कामानंतर परतीचा प्रवास हा महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे कुठेही काहीही बिघाड झाला तरी अंतराळवीर सुखरूप राहतील याची काळजी घेण्यात आली आहे. या गगनयान मोहिमेत एकूण पाच प्रयोग केले जाणार आहेत. त्यातील दोन प्रयोग हे जीवशास्त्राशी संबंधित आहेत. इतर प्रयोगही खूप महत्त्वाचे असणार आहेत.
(हेही वाचा – Independence Day : ‘लाँग वीकेंड’ची पद्धत पहिल्या स्वातंत्र्यदिनापासूनची?)
व्योममित्राचा सहभाग
गगनयान मोहिमेमध्ये अंतराळवीरांसोबत ‘व्योममित्रा’ नावाची ह्यूमोनाइड रोबोट-रोबोट कन्याही असणार आहे. व्योम म्हणजे आकाश! मित्रा म्हणजे मित्र! व्योममित्रा अंतराळ प्रवासात अंतराळवीरांची तपासणी करणार आहे. ती शून्य गुरुत्वाचा आणि किरणोत्साराचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासणार आहे. व्योममित्रामध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. व्योममित्रा प्रत्येक अंतराळवीरांना नावानिशी ओळखेल, त्यांच्याशी संवाद साधेल, प्रश्न निर्माण झाल्यास तो प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना मदत करेल. विशेष म्हणजे हे सर्व काम करीत असताना व्योममित्रा अजिबात थकणार नाही. ती सतत हसतमुख राहील. अंतराळवीरांना इस्रो ‘व्योमनॅाटस्’ म्हणून संबोधते. गगनयान मोहिमेमुळे भारतीय अंतराळवीरांबरोबरच ‘व्योममित्रा’ प्रसिद्धीस येणार आहे. इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था सर्व भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणार आहे.
इस्रोचे प्रयोग
इस्रोच्या मागील मोहिमांचा अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की मोहिमेचे उद्दीष्ट साध्य झाल्यावरही इस्रो थांबत नाही. सातत्याने नवनवीन प्रयोग करीत असते. चांद्रयान-३ चे उद्दीष्ट साध्य झाल्यावरही इस्रोचे प्रयोग चालूच राहिले. चांद्रभूमीवर लॅन्डरने उडी मारून पाहिली. तसेच चंद्रकक्षेत भ्रमण करणाऱ्या ॲार्बिटरला पुन्हा पृथ्वीकक्षेत आणले. २०३५ पर्यंत इस्रो अवकाशात ‘भारतीय स्पेस स्टेशन’ तयार करणार आहे. २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरणार आहे. लवकरच जपानबरोबर चंद्रासंबंधी एक संयुक्त मोहीम केली जाणार आहे. चंद्रावरची माती पृथ्वीवर आणली जाणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. गगनयानाच्या यशामुळे अंतराळ संशोधनातील नवीन दालन खुले होणार आहे. इस्रोच्या या यशामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा अभिमान वाटत आहे. (78th Independence Day)
(लेखक खगोल अभ्यासक आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community