कर्तव्य बजावत असताना समीर बाग सिरीज यांनी वारजे पुलावर झालेल्या अपघातामधील ८ वर्षांच्या चिमुकलीला खांद्यावरून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि तिचा जीव वाचवला. या कामगिरीमुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.
( हेही वाचा : मुंबईतल्या पर्यावरणप्रेमी संस्थेने शोधल्या पालींच्या नव्या प्रजाती )
चिमुकलीचे प्राण वाचवले
कोथरूड परिसरातील मनोज पुराणिक हे कुटुंबासमवेत वारजे पुलावरून प्रवास करीत असताना पुराणिक यांच्या चार चाकी वाहनाला ट्रकने मागून जोरात धडक दिली. या अपघातात गाडीत असलेले मनोज, त्यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाले. त्याचदरम्यान तिथे वाहतूक पोलिस कर्मचारी समीर बाग सिरीज ड्युटीवर होते. तेथील परिस्थिती लक्षात घेता, समीर यांनी रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या ८ वर्षांच्या मुलीला खांद्यावर घेतले व ते रूग्णालयाच्या दिशेने पळत सुटले.
समीर यांना जखमी चिमुकलीला खांद्यावर घेऊन जात असताना पाहून बाजूने जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने त्यांना थांबवलं आणि रिक्षातून येण्याची विनंती केली. त्यानंतर समीर बाग सिरीज यांनी काही मिनिटांत त्या चिमुकलीला रूग्णालयात दाखल केले. वेळीच मदत केल्याने चिमुकलीचे प्राण वाचले असून पुराणिक कुटुंबाने त्यांचे विशेष आभार मानले आहेत.