विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्वमध्ये तब्बल ८०३ पाणी गळत्यांचा शोध

193

विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या महापालिकेच्या के पूर्व विभागाच्यावतीने जलवाहिन्यांमधील गळती दूर करण्याचे काम हाती घेत दोन वर्षांमध्ये या भागातील ८०३ गळत्या दूर करण्यात आल्या आहेत. तर सिमेंट काँक्रिटीकरणामुळे तसेच नाल्यांमधून जाणाऱ्या ७३ जलवाहिन्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शिवाय ८६ ठिकाणी जुन्या आणि गंजलेल्या जलवाहिनी बदलण्यात आल्याचा दावा महापालिका जलअभियंता विभागाने केला आहे. त्यामुळे या भागातील गळती आणि पाणी दुषितीकरणाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात कमी झाल्याचाही दावा जलअभियंता विभागाने केला आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे कोविड काळात करण्यात आली आहेत.

( हेही वाचा : गोखले पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराला कार्यादेश जारी : रेल्वेच्यावतीने पाडकामाला सुरुवात)

महापालिकेच्या के-पूर्व विभागातील जलवाहिन्यांच्या जाळ्यांमधून पाण्याची गळती थांबवणे, पाण्याचे दुषितीकरण रोखणे, तसेच अपुऱ्या पाणी पुरवठासंबधित उपाय योजना करणे व आवश्यकता असल्यास नवीन जलवाहिनी टाकणे, जुन्या तसेच गंजलेल्या जलवाहिन्या बदलणे, सिमेंट काँक्रीट व पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेल्या वाहिन्यांमध्ये आड येणाऱ्या जलवाहिन्यांचे स्थलांतर करणे आणि जुन्या व गंजलेल्या जलवाहिन्या बदलणे आदी प्रकारच्या कामांसाठी महापालिकच्या जलअभियंता विभागाच्यावतीने ऑगस्ट २०२० पासून ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. या कंत्राटाचा कालावधी ऑगस्ट २०२२ रोजी संपुष्टात आला आहे.

या कालावधीमध्ये विद्यमान ८०३ जलवाहिन्यांवरील गळत्या दूर करण्यात आल्याचा दावा महापालिका जलअभियंता विभागाने केला आहे. तसेच जलवाहिन्यांवरील झडपा बसवणे, चेंबर्स बांधणे, दुरुस्ती करणे तसेच कॅमेराद्वारे जलवाहिन्यांची पाहणी करण्याचे ५५१ कामे करण्यात आल्याचेही जलअभियंता विभागाचे म्हणणे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व रहिवाशांकडून पाणी पुरवठ्यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार संबंधित कंत्राटदाराकडून कामे करून घेतली जात असतात. त्यामुळे सन २०२२ -२४ या कालावधीसाठी आता नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून अशाप्रकारच्या कामांसाठी सुमारे ९ कोटी रुपये या प्रशासकीय विभागात खर्च केले जाणार आहे. या पुढील दोन वर्षांच्या कामांसाठी अॅक्यूट डिझाईन्स ही कंपनी पात्र ठरली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी विलेपार्ले विभागातील काही भागांमध्ये अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई असल्याने माजी नगरसेविका अभिजित सामंत यांनी महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत चर्चा केली होती. त्यावेळी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.