महिला दिनी ८,०९२ महिलांनी घेतली कोविड लस!

महिला दिनाच्या निमित्ताने लसीकरण केंद्रांवर कोविडची लस घेण्यासाठी येणा-या महिलांसाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती.

आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील कोविड लसीकरण केंद्रांपैकी ५ ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्रांवर केवळ महिलांसाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये दिवसभरात ८ हजार ९२ महिलांचे लसीकरण पार पडले. महिला दिनाचे हे औचित्य साधून त्यांना गुलाबाच्या फुलासोबतच चॉकलेट, सरबत किंवा नाश्ता अशाप्रकारची व्यवस्था लसीकरण केंद्रावर करण्यात आली होती.

महिला दिनानिमित्ताने लसीकरण केंद्रांवर विशेष व्यवस्था

मुंबईत सध्या ‘कोविड – १९’ विषयक लसीकरणाचा तिसरा टप्पा प्रभावीपणे सुरु असून सार्वजनिक रुग्णालयांसह विविध खासगी रुग्णालयांमध्ये व लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असणारे व वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. पहिल्या व दुस-या टप्प्यात अनुक्रमे वैद्यकीय कर्मचारी व पहिल्या फळीतील कर्मचारी (फ्रंटलाईन वर्कर्स) यांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते.
आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने लसीकरण केंद्रांवर कोविडची लस घेण्यासाठी येणा-या महिलांसाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालय, वांद्रे कुर्ला संकुल जम्बो सुविधा केंद्र, नेस्को गोरेगाव जम्बो सुविधा केंद्र, मुलुंड जम्बो सुविधा केंद्र आणि दहीसर जम्बो सुविधा केंद्र या ५ लसीकरण केंद्रांवर करण्यात आलेल्या स्वतंत्र व्यवस्थेला महिलांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले लसीकरण करवून घेतले. या पाचही लसीकरण केंद्रांवर आज दिवसभरात ८ हजार ९२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर अनेक लसीकरण केंद्रांवर आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने लसीकरणासाठी येणा-या महिलांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागतही करण्यात येत होते. तर काही ठिकाणी गुलाबाच्या फुलांसोबतच चॉकलेट, सरबत किंवा नाष्ता अशीही व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

(हेही वाचा : शाळांची स्वच्छता की महापालिकेच्या तिजोरीची साफसफाई? शाळा बंद असूनही कोट्यावधींचा खर्च!)

सर्वाधिक वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेंटरमध्ये लसीकरण 

दिवसभरात वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात १ हजार ९८२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. या खालोखाल गोरेगाव परिसरातील नेस्को जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात दिवसभरात १ हजार ९३२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयातील लसीकरण केंद्रात दिवसभरात १ हजार ९०८ महिलांचे लसीकरण करण्यात आले. दहीसर येथील जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात दिवसभरात १ हजार ८५२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. तर मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात दिवसभरात ४१८ महिलांचे लसीकरण करण्यात आले. यानुसार या ५ लसीकरण केंद्रांवर दिवसभरात एकूण ८ हजार ९२ महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here