कोरोना काळात पॅरोल (संचित रजा) वर बाहेर पडलेल्या ४ हजार २४१ कैद्यांपैकी ८७२ कैदी फरार झाले आहेत. फरार झालेल्या कैद्यांवर तुरुंग प्रशासनाकडून राज्यभर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात ९० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार झालेल्या कैद्यांपैकी अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल असून जन्मठेप झालेल्या कैद्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.
८७२ कैदी फरार
राज्यात लहानमोठे असे एकूण ६० कारागृह असून या सर्व कारागृहात सध्याच्या घडीला न्यायबंदी आणि शिक्षा झालेले मिळून ४३ हजार ४६ कैदी आहेत. कोरोनाच्या काळात कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी न्यायबंदी असलेल्या कैद्यांना तात्पुरता जामीन तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांना तत्कालीन संचित रजा मंजूर करण्यात यावी असे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. कारागृह प्रशासनाने कोरोनाच्या काळात ४ हजार २४१ शिक्षा झालेल्या कैद्यांना संचित रजेवर पाठवले होते. संचित रजा देण्यापूर्वी कारागृह प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया राबवून कैद्यांना संचित रजेवर पाठवले होते.
खटले नोंदवण्याचे निर्देश
महाराष्ट्र सरकारने १ मे रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत लादलेले सर्व निर्बंध मागे घेतल्यानंतर, राज्याच्या गृह विभागाने ४ मे रोजी सर्व दोषी कैद्यांना कारागृहात परत येण्याचे निर्देश देऊन तात्पुरत्या पॅरोलबाबत आदेश जारी केला. जे कैदी परत आले नाहीत त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २२४ (कायदेशीर कोठडीला विरोध करणे) अंतर्गत खटले नोंदवण्याचे निर्देशही गृह विभागाने कारागृह विभागाला दिले आहेत.
( हेही वाचा : लोणावळा फिरायला जाताय? पोलिसांची पर्यटकांवर असणार करडी नजर)
या आदेशानंतर कारागृह विभागाने तातडीच्या पॅरोलचा लाभ घेतलेल्या सर्व कैद्यांच्या पॅरोल स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असता असे आढळून आले की, ३,३४० कैदी दिलेल्या निर्धारित वेळेत कारागृहात परतले, उर्वरित ८७२ कैदी कारागृहात परतले नाही, या कैद्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांना सांगण्यात आले मात्र हे कैदी दिलेल्या पत्त्यावर सापडले नसल्यामुळे अखेर त्यांच्या विरुद्ध राज्यभरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. कारागृह प्रशासनाने राज्यातील विविध पोलीस ठाण्यात ९० पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कारागृह प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. ८७२ कैद्यांमध्ये अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल असून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या अनेक कैद्यांचा त्यात समावेश असल्याची माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community