मध्य रेल्वेची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात आणखी ९०० कॅमेरे उपनगरीय स्थानके आणि टर्मिनसवर बसवण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई विभागातील रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या एकूण चार हजार होणार आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ उपक्रमाचे जाहिरात हक्कांचे कंत्राट वादाच्या भोवऱ्यात! )
९०० सीसीटीव्ही कॅमेरे
रेल्वे हद्दीत कोणताही गुन्हा घडला तर त्याचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत होते. त्यामुळे लवकरत आता स्थानकांवर सुमारे ९०० कॅमेरे बसवण्यात येतील अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून वर्षभरात मुंबई विभागातील बहुतांश स्थानकांमध्ये नवीन कॅमेरे बसवण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
- सीएसएमटी उपनगरीय स्थानक आणि टर्मिनसवर सुमारे ३०० कॅमेरे असून त्यात आणखी २५ नवीन कॅमेऱ्यांची भर पडेल.
- लोकमान्य टिळक टर्मिनसवरही आणखी २५ कॅमेरे लावले जाणार आहेत.
- याशिवाय कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, डोंबिवली यासह मुख्य मार्ग, लोणावळा, कर्जत, कसारा, हार्बर लाईनवरील स्थानके तसेच ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवरील स्थानकांवरील कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.