मुंबईतील तब्बल 92 हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे समोर आले आहे. याशिवाय 40 व्यवसायिक इमारतींनाही अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे. येत्या 120 दिवसांत अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. संपूर्ण मुंबईत अग्निशमन दलाने एकाच वेळी अचानक तपासणी मोहीम सुरू केली. यावेळी करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत मुंबईतील 92 हॉटेल्समध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे दिसून आले. यानंतर अग्निशमन दलाने मुंबईतील 92 हॉटेल्स आणि 40 व्यावसायिक इमारतींना नोटीस पाठवली आहे.
(हेही वाचा – निवृत्त MSRTC कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यासंदर्भातील आदेशाला स्थगिती, न्यायालयानं म्हटले…)
हॉटेल असो किंवा व्यावसायिक इमारती प्रत्येक ठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना करणे संबंधित मालक आणि सोसायटी धारकांना बंधनकारक आहे. या ठिकाणी अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित केलेली आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून अचानक पाहणी केली जाते. त्या मोहिमेचाच भाग म्हणून मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील 440 हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही, हे 3 आणि 4 डिसेंबर रोजी संपूर्ण मुंबईत तपसाणी केली. यावेळी ही कारवाई करण्यात आली.
तर दुसरीकडे मुंबईतील 88 व्यावसायिक इमारतींची सुद्धा यामध्ये पाहणी करण्यात आली. यामध्ये 40 व्यावसायिक इमारतींमध्ये सुद्धा अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे आढळून आले आहे. मुळे या 40 व्यावसायिक इमारतींना सुद्धा अग्निशमन दलाने नोटीस बजावली असून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community