“तुम्हारा तो शोर है, हमारा तो दौर आएगा”! स्थायी समितीत कंत्राटाचे ९६ प्रस्ताव ठेवले राखून

125

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या शेवटच्या सभेमध्ये तब्बल १८० प्रस्ताव सादर करण्यात आल्याने यांच्या मंजुरीबाबत सर्वांच्या उत्सुकता ताणल्या होत्या. आयकर विभागाच्या चौकशीतून बाहेर पडलेले स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे सर्व प्रस्ताव मंजूर करतील की, भाजपच्या मागणीनुसार हे प्रस्ताव मागे घेतले जातात याकडे सर्वांच्या नजरा होत्या. परंतु बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत १८० पैंकी तब्बल ९६ प्रस्ताव अध्यक्षांनी राखून ठेवले. हे सर्व प्रस्ताव कंत्राट कामांचे होते. तर उर्वरीत कार्योत्तर मंजुरी तसेच इतर प्रस्ताव समितीने मंजूर केले. त्यामुळे भाजपच्या सदसय्ची आंदोलन आणि निदर्शने करण्याची मोठी संधी हुकली गेली. मात्र, यावेळी अध्यक्षांनी पुन्हा समितीत शेरो शायरी करत तुम्हारा तो शोर है, हमारा तो दौर आएगा असे सांगत विरोधकांना सूचक चिमटाही काढला.

स्थायी समितीत कंत्राटाचे प्रस्ताव ठेवले राखून

मुंबई महापालिकेची स्थायी समितीची बैठक बुधवारी पार पडली. येत्या ७ मार्च रोजी महापालिकेच्या सदस्यांची मुदत संपुष्टात येत असल्याने बुधवारी पार पडलेली बैठक ही शेवटची सभा मानली जात असल्याने या सभेपुढे १८० प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. मात्र, पहिल्या प्रस्तावापासून अध्यक्ष यशवंत जाधव यांनी राखून ठेवण्याचा पावित्रा घेतला. आणि त्यानंतर प्रत्येक विकासकामांच्या कंत्राट कामांचे प्रस्ताव हे राखून ठेवले गेले. पटलावर ठेवण्यात आलेल्या १८० पैकी १०० प्रस्ताव हे कंत्राट कामांचे होते. बाकीचे सर्व प्रस्ताव कार्योत्तर मंजुरी किंवा इतर पद सातत्याचे होते.

मागील तीन तहकूब सभेतील १२ प्रस्ताव राखून 

मात्र, कंत्राट कामांपैंकी हँकाँक पूल व घाटकोपर- मानखूर्द पुलाच्या विस्तारीत कामांच्या कंत्राटातील वाढीव कंत्राटाला मंजुरी अशाप्रकारे मोजकेच दोन चार प्रस्ताव मंजूर केले. उर्वरीत ९६ प्रस्ताव हे राखून ठेवले. यामध्ये नालेसफाईपासून ते नाल्यांचे बांधकाम, उद्यानांच्या देखभालीपासून ते खोदलेले चर बुजवणे तसेच कोविड सेंटरच्या खर्चाचे प्रस्ताव राखून ठेवण्यात आले. यामध्ये मागील तीन तहकूब सभेतीलही १२ प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या पटलावर १०८ ते ११० प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहे.

(हेही वाचा – Russia Ukraine War: युद्धाने भारतीयाचं जगणं केलं मुश्कील!)

“वजूद है फक्र, कौन क्या सोचता है, इसकी मुझे नही फिक्र”

यावेळी स्थायी समिती अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना चार वर्षे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक गटनेत्यांचे तसेच समिती सदस्यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मिळालेल्या सहकार्याबद्दल आभारही मानले. आपल्याकडून काही कळत नकळत चूक झाली असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमाही त्यांनी मागितली. यावेळी बोलतांना त्यांनी कुछ देर की खामोशी है, आज तुम्हारा शौर है, कल हमारा दौर आएगा अशी शायरी मारत आपण सर्व पुन्हा या सभागृहात एकत्र येऊ, असे सांगितले. तसेच वजूद है फक्र, कौन क्या सोचता है, इसकी मुझे नही फिक्र असेही सांगत आपणा यापुढे काम करतच राहणार असे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.