मुंबईतील ९८३ वृक्षांनी घेतला मोकळा श्वास

115

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या वृक्ष संजीवनी मोहीम अंतर्गत आतापर्यंत ९८३ वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले आहे. झाडांच्या मुळावर सिमेंट काँक्रीटचा थर चढवल्याने त्या झाडांचा श्वास गुदमरत होता. त्यामुळे या झाडांच्या मुळावरील सिमेंट काँक्रीटचा भार मोकळा करून त्या झाडांना मोकळा श्वास घेण्यास वाट मोकळी करून दिली आहे.

(हेही वाचा – सावधान! मुंबईत या 74 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका, सर्वेक्षणातून माहिती उघड)

मुंबई महानगरपालिकेमार्फत २२ एप्रिल रोजी येणाऱ्या जागतिक वसुंधरा दिना‍निमित्‍त ‘वृक्ष संजीवनी अभियान’ राबविण्‍यात येत आहे. सन १९७० पासून दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभरात विविध पर्यावरणविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षीच्‍या जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्‍य साधून उद्यान खात्‍यामार्फत अतिरिक्त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये वृक्ष संजीवनी मोहीम विविध सामाजिक संस्‍था, शाळा, महाविद्यालये यांच्‍या सहाय्याने राबविण्‍यात येत आहे.

का राबवली जातेय वृक्ष संजीवनी मोहिम?

tree free 1

वृक्ष संजीवनी मोहिमेदरम्‍यान वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढून लालमाती टाकणे, वृक्षांवरील खिळे, पोस्‍टर, बॅनर, केबल्‍स काढून वृक्षांना मोकळा श्‍वास मिळावा, यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येत आहेत. खिळे, पोस्‍टर, विद्युत रोषणाई, केबल इत्यादींमुळे वृक्षांना इजा होते व त्‍याठिकाणी झाडाचे खोड कुजून वृक्ष मोडून पडण्‍याची अथवा मृत होण्‍याची शक्‍यता असते. तसेच मुळांभोवती काँक्रिटीकरण केल्‍यामुळे मुळांची वाढ खुंटते व जमिनीत पाणी न शोषल्‍याने वृक्ष मृत होण्‍याची शक्‍यता असते. या कारणाने मुंबई महानगरपालिकेमार्फत वृक्ष संजीवनी मोहीम १८ एप्रिल २०२२ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत हाती घेण्यात आली आहे. आजमितीपर्यंत एकूण ९८३ वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्‍यात आले आहे.

६,१७८ झाडांवरील काढले खिळे

या मोहिमेंतर्गत ६ हजार १७८ वृक्षांवरील खिळे / जाहिरात फलक काढण्‍यात आले आहेत. एकूण ९४.१९४ किलो खिळे काढण्‍यात आले असून १ हजार ३२५ जाहिरात फलक हटवण्यात आले आहेत. या मोहिमेत पार्ले वृक्ष मित्र, एकता मंच, रिव्‍हर मार्च एलएसीसी, अंघोळीची गोळी सारख्‍या सामाजिक संस्‍था, विविध शाळा, महाविद्यालये यांनी भाग घेतला आहे. तसेच विद्यार्थी व नागरिकांमध्‍ये मोहिमेबाबत जनजागृती ही करण्‍यात येत आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

जीपीएस प्रणालीने प्रत्येक झाडाला जपा

मुंबईभर सुरु असणा-या झाडांची हेळसांड थांबवायची असेल तर मुंबईतील झाडांची जीपीएल प्रणालीतून मोजणी केली जावी, अशी मागणी रिव्हर मार्चचे प्रमुख सदस्य गोपाल झावेरी यांनी केली. यामुळे झाडांना सुरक्षा मिळेल तसेच झाड कापले गेल्यास त्याची माहितीही त्वरित उपलब्ध होईल, असा मुद्दाही झावेरी यांनी उपस्थित केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.