१०० रुपयांच्या ड्रमसाठी ‘त्याने’ हजारो प्रवाशांचे प्राण आणले होते संकटात!

केवळ १०० रुपयांच्या ड्रमसाठी त्याने हजारो प्रवाशांचे प्राण संकटात आणले होते, परंतु मोटरमनच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली. या प्रकरणात आता रेल्वे सुरक्षा दलाने एका १५ वर्षाच्या मुलाला अटक केली आहे.

काय आहे घटना

मागील आठवड्यात मध्य रेल्वेच्या सेंडहर्स्ट रोड स्थानकाजवळील फास्ट ट्रकवर ही घटना घडली होती. सीएसएमटी येथून कल्याणच्या दिशेने निघालेल्या एका फास्ट लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर एक लोखंडी ड्रम आडवा आला होता. सतर्क असलेल्या ट्रेनच्या मोटरमनने वेळीच इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवल्याने मध्य रेल्वे मार्गावरील मोठी दुर्घटना टळली होती. या घटनेची दखल रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेतली होती, व रेल्वे सुरक्षा दल आणि तपास यंत्रणेला या प्रकरणाचा छडा लावण्याचा आदेश दिला होता.

(हेही वाचा – फक्त औरंगाबाद,उस्मानाबाद नाही तर ‘या’ जिल्ह्यांचीही बदलली आहेत नावे)

रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असलेल्या वस्तीमध्ये चौकशी करून आपल्या खबऱ्यांच्या मार्फत एका १५ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच तो ड्रम ट्रॅकमध्ये सोडून पळ काढला होता, अशी माहिती समोर आली. ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन मुलगा हा भुरट्या चोर आहे, त्याने ट्रॅकच्या शेजारी असलेल्या वस्तीतून लोखंडी ड्रम चोरी करून तो भंगारात विकण्यासाठी रेल्वे ट्रॅकमधून निघाला होता, समोरून ट्रेन येत असल्याचे बघून तो घाबरला आणि ड्रम ट्रॅकवर सोडून त्याने पळ काढला होता अशी माहिती समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने त्याला या गुन्ह्यात ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधार गृहात केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here