भंडाऱ्यात गुरुवारी सायंकाळी बपेरा गावातील बावनथडीमधील लहान कालव्यात सापडलेल्या वीस महिन्यांच्या नर वाघाचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे उघडकीस आले आहे. संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आरोपी पितापुत्रांनी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा कबूल केला. मात्र वाघाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झालेलाच नाही असा अहवाल देणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी क्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वीजेच्या धक्क्याने वाघ मृत्यू पावल्याची ही यंदाच्या वर्षातील भंडऱ्यातील दुसरी घटना आहे.
शुक्रवारी या वाघाचे शवविच्छेदन तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. मात्र अहवालत वीजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याची सुतराम शक्यता आढळली नसल्याचा अहवाल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे ही घटना या नर वाघाचे इतर स्थानिक वाघांशी झालेल्या झुंजीत मृत्यू झाल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी लावला होता. मात्र तपासणी सुरु असताना शनिवारी घटनास्थळाच्या 200 मीटर अंतरावरील गावातील एका शेतात वनधिकाऱ्यांना वन्यजीवांचे अवशेष सापडले. त्यावेळी प्रकरणाला नवे वळण मिळाले.
वाघाचा मृतदेह कालव्यात दिला फेकून
शेतातील रानडुक्करांचा उपद्रव मिटवण्यासाठी शेतकरी वडिलांना मदत करण्यासाठी आरोपी तरुणाने विजेची तार शेतात रोवली. तुळशीराम दशरथ लिल्हारे आणि त्यांचा मुलगा शशिकांत तुळशीराम लिल्हारे असे आरोपी पिता पुत्रांचे नाव आहे. वीजेच्या तारेला चिकटून मृत पावणारी रानडुक्करे पिता पुत्र शेतातच पुरत असत. व्यवसायाने मॅकेनिकल अभियंता असलेला हा तरुण पुण्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत होता. मात्र लॉकडाऊनमध्ये तो घरी परतला अशी माहिती चौकशीअंती आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी सकाळी त्यांना शेतात वीजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी घाबरून नजीकच्या कालव्यात वाघाचा मृतदेह टाकून पोबारा केला. मात्र हे काम दोघांकडून शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणात अजून काही आरोपी सामील असल्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. सोमवारी दोन्ही आरोपींकडून वनविभाग प्रात्यक्षिक करून घेईल. त्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल अशी माहिती भंडारा वनविभागाचे ( प्रादेशिक ) उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी दिली.
( हेही वाचा: वैद्यकीय अध्यापकांच्या वेतनात ३० ते ४० हजारांची होणार वाढ )
आरोपी तुळशीराम दशरथ लिल्हारे याच्या शेतात काही वन्यप्राण्यांचे हाडे ,कवठी, करंट लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खुंट्या आणि इतर साहित्य वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले होते. आरोपीच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. बैलगाडीतून वाघाचा मृतदेह जवळच्या कालव्यात आणून टाकला. बैलगाडीतील रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत अहवालासाठी पाठवले जाणार आहेत.
आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी
रविवारी आरोपी तुळशीराम दशरथ लिल्हारे आणि शशिकांत तुळशीराम लिल्हारे या दोघांना दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. हा वन गुन्हा असून हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे व आरोपींना पाच दिवसांची वन कोठडी मंजूर केली.
वीजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू हा शिकारीचाच गुन्हा
वाघाचा मृत्यू अनैसर्गिक आहे. कालव्यात मृतदेह आढळणे आम्हांला संशयास्पद वाटले. त्यामुळे आम्ही गुरुवारपासून तपास सुरु केला होता अशी माहिती भंडारा वनविभाग (प्रादेशिक ) चे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी दिली.
तर आरोपींना सात वर्षांची कोठडी
भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 नुसार वाघ हा अनुसूची 1 मध्ये समाविष्ट वन्य प्राणी असून त्याला कायद्याद्वारे सर्वोच्च संरक्षण दिलेले आहे. वाघाची शिकार करणाऱ्या आरोपीस तीन ते सात वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.