उल्‍हासनगरमधील ३६ वर्षीय अवयव दाता ठरला यंदाचा तरुण दाता

86
हायपरऑक्सल्युरियाने ग्रस्त असलेल्या २२ वर्षीय मुलीच्या मदतीसाठी मृत्यूपश्चात ३६ वर्षीय तरुण धावून आला. उल्हासनगर येथील ३६ वर्षीय मृत दात्याने तिला यकृत आणि मूत्रपिंड दान केले. या वर्षात वयोवृद्धांकडून अवयवदान केले जात असताना, ३६ वर्षीय तरुणाने केलेल्या अवयवदानामुळे नवा आदर्श निर्माण झाला आहे.
उल्हासनगर येथील ३६ वर्षीय मृत दात्याने तिला यकृत आणि मूत्रपिंड दान केले. ७ सप्‍टेंबर रोजी या दात्याचा रस्‍त्‍यावर अपघात झाला होता, डोक्यासह त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या आणि त्याला फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडमध्ये आणण्यात आले होते. चार दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्याच्या गंभीर दुखापतींमुळे त्याची प्रकृती खालावली आणि त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. इतर रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी त्याच्‍या कुटुंबियांनी त्‍याचे अवयव दान करण्‍यास पुढाकार घेतला.
फोर्टिस हॉस्पिटलने हायपरऑक्सल्युरियाने ग्रस्त असलेल्या २२ वर्षीय मुलीवर यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. या स्थितीत यकृतामध्ये काही एन्झाइम्सची कमतरता होते, ज्यामुळे रक्तातील ऑक्सलेटचे प्रमाण जास्त होऊन किडनी स्टोन्‍स (मूतखडा) तयार होतात आणि मूत्रपिंड निकामी होते. अशा रूग्णांमध्ये फक्‍त मूत्रपिंड प्रत्यारोपण केल्यास वारंवार मूत्रपिंड निकामी होण्‍याची शक्‍यता असते, ज्‍यामुळे यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाने ही स्थिती बरी होऊ शकते. या मुलीला गेल्या दीड वर्षांपासून किडनी निकामी होण्‍याचा त्रास होत होता आणि तिला तातडीने प्रत्यारोपणाची गरज होती. ती नागपूरची रहिवासी आहे.
( हेही वाचा: मुनगंटीवार पुन्हा वनमंत्री होताच ‘त्या’ वनाधिकाऱ्यांची हजेरी )

अशाच पद्धतीने 44 वर्षीय पुरुषानेही यकृत, मूत्रपिंड, पेशी आणि डोळ्यांचे मृत्यूपश्चात दान केल्याने चार रुग्णांना नवे जीवनदान मिळाले. या रुग्णाचा अतिरक्तस्त्रवामुळे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात मृत्यू झाला होता. 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.