नागपुरात खळबळ… रेल्वे स्थानकावर स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली

146

नागपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री 8 वाजता जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेश दाराजवळ असलेल्या ट्रॅफिक पोलीस चौकीच्या मागे जिवंत स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली आहे. बॉम्ब शोधक पथक म्हणजेच बीडीडीएसने ती बॉम्ब सदृश वस्तू ताब्यात घेऊन डिफ्युज करण्यासाठी नेली असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – चौकशीनंतर सुहेल खंडवाणी, मोबिदा भिवंडीवाला यांची सुटका)

बॅगेचा पंचनामा करून स्फोटक साहित्य जप्त

यासंदर्भातील माहितीनुसार नागपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी संध्याकाळी बॉम्ब आढळल्याची चर्चा होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरून एक बॅग जप्त केली. या बॅगेच्या तपासणी अंती साधारण ५५ जिलेटीनच्या कांड्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी बॅगेचा पंचनामा करून सदर स्फोटक साहित्य जप्त केले. जिलेटीनच्या कांड्यांची ही बॅग कुणी नागपुरातून बाहेर नेत होते की, बाहेरून नागपुरात आणण्यात आली याचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

स्फोटके आढळल्याने पोलिसांच्या चिंतेत वाढ

नागपुरात गेले दोन दिवस महत्वाच्या व्यक्तिंचे दौरे होते. रविवारी आयआयएम इमारतीच्या लोकार्पणासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद नागपुरात होते. त्यासोबतच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी देखील नागपूर दौऱ्यावर होते. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील रविवारी नागपुरात होते. अतिविशिष्ट लोकांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारची स्फोटके आढळून आल्यामुळे पोलिसांच्या चिंतेत वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.