कोकणात काळ्या बिबट्याचे दर्शन

199

रविवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर गावातील जंगलात काळ्या बिबट्या आणि बछडा दिसल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला. गेले दोन दिवस या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असला तरीही वनविभागाने काळ्या बिबट्याची आणि बछड्याची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या घटनेची शहानिशा करण्यासाठी वनविभागाचे उच्चपदस्थ अधिकारी येत्या शनिवार-रविवारी रत्नागिरीत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोकणात बिबट्याचे दर्शन अधूनमधून होत असले तरीही काळ्या बिबट्याच्या अधिवासाबाबत वनविभागाकडून अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. २०१४ साली रत्नागिरीत काळ्या बिबट्याचा बचाव करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात १६ मार्च रोजी एका गावाच्या पाड्याजवळ भर दुपारी सव्वाचारच्या सुमारास बिबट्या दिसल्याची माहिती वन्यजीवप्रेमींनी दिली. त्यानंतर एका स्थानिक डॉक्टराच्या घरातील पाळीव प्राण्याला त्याच्या डोळ्यांदेखत मारले. काळ्या बिबट्याला पाहणारे प्रत्यक्षदर्शी असले तरीही वनविभागाने याबाबत अद्यापही काहीच माहिती दिलेली नाही.

बिबट्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार भोवणार

रत्नागिरीतील एका स्थानिक पक्षी छायाचित्रकाराने हा व्हिडिओ काढल्याचा दावा कऱण्यात येत आहे. या छायाचित्रकाने जंगलात जाण्याची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती. या छायाचित्रकाराने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, ही घटना उजेडात आली. यावेळी छायाचित्रकाराने काळ्या बिबट्या आणि बछडा नेमके कुठे आढळून आलेत, ही जागाही नमूद केली. या प्रकारानेच छायाचित्रकार जंगलात विनापरवाना गेल्याचे उघडकीस आले. या छायाचित्रकाराला मंगळवारी वनविभागाने चौकशीसाठी बोलावले असल्याचेही सूत्रांकडून समजले.

( हेही वाचा: तिसऱ्या आघाडीचा २०१९मध्ये फसलेला प्रयोग २०२४ला पुन्हा होणार! )

प्राणीप्रेमींचा दावा

कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काळा बिबट्या आढळतो. मात्र तो सहसा दिसत नाही. त्यातच १६ मार्च रोजीच्या घटनेत चक्क दुपारच्या वेळात मानवी वस्तीजवळ गुहागर येथे काळ्या बिबट्या आढळून आला. माणसे दिसूनही त्याने पळ न काढता सहज संचार केला. हा बिबट्या खूप काळापासून मानवी वस्तीजवळ राहत असल्याचा दावा प्राणीप्रेमींनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.