हिवसाळी वातावरणात या महिन्याची सुरुवात झालेली असताना डिसेंबर महिन्याचा पहिला रविवार धुरक्यांचा ठरला. मुंबईभर दिवसभरात धुरक्यांची चादर ओढली गेली होती. मुंबई धुरक्यात हरवल्यानं मुंबईकरांचा वीकेण्ड फिव्हर हा घरात बसूनच धुरक्यांचा आनंद लुटण्यात गेला.
हवामान खात्याची माहिती
थंडीच्या वातावरणात मोसमातील बदलांवर आता सोशल मिडीयाच्या व्यासपीठावर वेगवेगळ्या मीम्सला उधाण येतंय. रविवारची धुरक्यात हरवलेली मुंबईही कित्येकांच्या ‘इन्स्टाग्राम’ या सोशल माध्यमावरील फोटो स्टोरीमध्ये झळकत होती. थंडीत हवेतील धूलिकण इतरत्र हलत नाहीत. परिणामी ते एकाच जागी स्थिरावतात, त्यामुळे धुरक्यांची चादरच जणू तयार होते. हे चित्र थंडीच्या दिवसांत सामान्य असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिका-यांनी दिली.
तापमानातील वाढ कायम
पावसाच्या जाण्यानंतर कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम आहे. कुलाब्यात कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअसवर नोंदवलं गेलं. सांताक्रूझमध्ये कमाल तापमान ३२.३ तर किमान तापमान २२ अंशावर नोंदवलं गेलं. दोन्ही ठिकाणी आर्द्रतेत घट झाल्यानं दुपारी बारानंतर केवळ लख्ख सूर्यप्रकाश मुंबईकरांना अनुभवता आला. कुलाब्यात आर्द्रता ६५ टक्के तर सांताक्रूझमध्ये ६३ टक्क्यांपर्यंत घटली होती. त्यामुळे सूर्यप्रकाशातही घामांचा धारांपासून मुंबईकरांची सुटका झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ताही ९२ टक्क्यांवर नोंदवल्याची माहिती ‘सफर’ प्रणालीच्या माध्यमातून दिली गेली.
( हेही वाचा : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ‘त्या’ गावात शाळा नाही! )
मुंबईसाठी हवामानाचा अंदाज
- ६ डिसेंबर – कमाल तापमान ३३ किमान २२ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता. आकाश ढगाळ राहील.
- ७ डिसेंबर – कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता. आकाश ढगाळ राहील.