सैफी रुग्णालयातील मेडिकल स्टोर्स मालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मंत्रालयातील लिपिकाला दिलेले इंजेक्शन हे बोगस असल्याचे एफडीएच्या चौकशीत समोर आल्यानंतर एफडीएच्या तक्रारीवरून व्ही.पी रोड पोलीस ठाण्यात सैफी रुग्णालयातील मेडिकल स्टोर्सच्या मालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इंजेक्शनमुळे मंत्रालयातील लिपिकाचा मृत्यू झाल्यानंतर एफडीएकडे हे  इंजेक्शन सैफी रुग्णालयाकडून तपासणीसाठी पाठवले होते. इंजेक्शनमध्ये दोष आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सैफी मेडिकल स्टोअर्स, एनआरएस फार्मा, आदितजित फार्मा वितरक जैन एजन्सी, देव फार्मा, एमडीके फार्मा, वर्धन वितरक सिद्धिविनायक फार्मा, एमसी मेडीटेक सिस्टम, जय माँ अंबा मेडिकोज, कान्हा फार्मा आणि जीआर फार्मा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या औषध कंपन्या आणि पुरवठादारांची नावे आहेत.
मंत्रालयात काम करणारे लिपिक विनोद कांबळी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांना दक्षिण मुंबईतील सैफी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्या रक्ताचे नुमने तपासण्यात आले असता कांबळी यांच्या शरीरातील लोहचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले. रुग्णालयाने रुग्णालयात असलेल्या मेडिकल स्टोअर्समधून काही औषधे आणि इंजेक्शन मागवण्यात आले होते. त्यापैकी विवेक कांबळी यांना आरोफर एफसीएम इंजेक्शन (फेरिक कार्बोक्सीमाल्टोज 500 मिलीग्राम 10 एमएल) दिले गेले आणि कांबळीवर इंजेक्शनचा वेगळा परिणाम जाणवू लागला आणि १२  ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
विवेक कांबळी यांची पत्नीदेखील मंत्रालयात काम करते. तिच्या पतीला दिलेल्या इंजेक्शनवर त्यांना संशय येताच त्यांनी त्याची तक्रार सैफी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे केली. सैफी रुग्णालयाने एफडीएला कळवले आणि तपासणीसाठी इंजेक्शन एफडीएकडे (अन्न व औषध प्रशासन) दिले. एफडीएने याबाबत चौकशी सुरू केली आणि सुरक्षेच्यादृष्टीने लोह सप्लिमेंट इंजेक्शन ओरोफरची बॅचदेखील परत मागवून घेतली.
पोलिसांनी सांगितले की, एफडीएने हे नमुने पालघरमधील तारापूर येथील समृद्ध फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड या औषध कंपनीकडे पाठवले. “एफडीएने औषधासह पाठवलेल्या नमुन्यांच्या चाचणीच्याआधारे असे आढळून आले आहे की नमुना आमच्या नियंत्रण नमुन्यांशी जुळत नाही आणि रंग तसेच मजकूरासाठी मंजूर शेड कार्ड जुळत नाही. त्यामुळे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हे इंजेक्शन बनावट आहे. दरम्यान एफडीएने या इंजेक्शनची निर्माती कंपनी पुरवठादार व मेडिकल स्टोअर्स यांची माहिती काढून त्यांच्या विरोधात व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) औषध निरीक्षक राजेश बनकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे, विश्वासभंग, बनावट सील बनवणे किंवा ठेवणे इत्यादी कलमांतर्गत तसेच औषधे आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here