छोटा शकीलचा मेव्हुणा आरिफ भाईजान विरुद्ध गुन्हा दाखल

116

५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाला व त्याच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात खंडणीखोर छोटा शकील याचा मेव्हुणा आरिफ अबूबकर शेख उर्फ आरिफ भाईजान उर्फ बेग मिर्झा यांच्यासह तिघांविरुद्ध डोंगरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.

५ एकर जमीन विकत घेतली होती

टेरर फंडिंग प्रकरणी मे महिन्यात एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने आरिफ भाईजान याला अटक केली आहे. तसेच छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुट याला देखील या प्रकरणातच एनआयएने अटक केली आहे. डोंगरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रारदार हे मुंबईतील चोर बाजार येथील अँटिक वस्तू (दुर्मिळ) विकण्याचा व्यवसाय आहे. २००७ मध्ये तक्रारदार हे बांधकाम या व्यवसायाकडे वळले होते, त्या दरम्यान त्यांनी मीरा रोड येथे ५ एकर जमीन विकत घेतली होती, मात्र ही जमीन वादग्रस्त असल्याचे कळताच तक्रारदार यांनी ही जमीन विकण्याचा निर्णय घेऊन ग्राहक शोधत असताना एका इस्टेट एजंटने तक्रारदार यांची भेट आरिफ भाईजान यांच्यासोबत करून दिली होती.

(हेही वाचा दुकानांच्या पाट्या सात दिवसांमध्ये बदला : महापालिकेची दुकानदारांना अंतिम संधी अन्यथा होणार सोमवारपासून थेट कारवाई)

डोंगरी पोलिसानी गुन्हा दाखल केला

परंतु आरिफ भाईजान हा छोटा शकीलचा मेव्हुणा असल्याचे माहीत असल्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा त्यांना भेटण्यास टाळाटाळ केली, मात्र आरिफ भाईजान याने तक्रारदार यांना भेटायला बोलावून घेतले. तक्रारदार हे त्याला भेटायला गेले असता, “तू जानता है ना, मैं कौन हूँ मै हाजी साहब का काम यहाँ संभालता हूँ रवि ग्रुप हाजी साहबका है, और जयेश शहा का हाजी साहब से लेन देन है मुझे हाजी साहबने बोला है, इसलिये ये मॅटर सेटल होगा तो सिर्फ मेरे से ही होगा मेरे आदमी तुमपर नजर रखे हुये है इसलिये मैं जैसे बोलता हूँ, वैसे कर, त्यावेळी आरिफ भाईजानने हाजी साहब म्हणजे त्याचा नातेवाईक कुख्यात गैंगस्टर शकील बाबू मोईद्दीन शेख उर्फ छोटा शकील असे त्याने तक्रारदार यांना सांगून ५ कोटी रुपयाची खंडणी मागितली. आरिफ भाईजान याला एनआयएने अटक केल्याचे कळताच तक्रारदार शनिवारी डोंगरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरिफ भाईजान, जयेश शहा सह तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसानी गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा पुढील तपासासाठी खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.