सीआयडी अधिकाऱ्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबईतील एका व्यवसायिकाच्या पत्नीविरुद्ध लूक आउट नोटीस काढणाऱ्या कोलकत्ता येथील सीआयडी अधिकाऱ्याविरोधात मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने अटकेची धमकी देऊन १० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप व्यवसायिकाने केला आहे. तक्रारदार व्यवसायिक दुसरा तिसरा कोणी नसून खासदार संजय राऊत यांनी ज्याचे ईडी अधिका-यांशी संबंध जोडले होते तो जितेंद्र नवलानी असल्याची माहिती समोर येत आहे.
जितेंद्र नवलानी हे कुलाबा येथे वास्तव्यास असून त्यांचे कार्यालय नरिमन पॉईंट या ठिकाणी आहे. नवलानी हे परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय मानले जातात. ईडीचे हस्तक बनून मुंबईतील मोठे विकासक आणि व्यवसायिकांकडून कोट्यवधींच्या खंडणी वसूलीचा आरोप जितेंद्र नवलानी़ यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केला होता.  या प्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले होते. नवलानी यांनी १४ नोव्हेंबर रोजी वरळी पोलीस ठाण्यात कोलकत्ता राज्य अन्वेषण विभाग (सीआयडी)च्या अधिका-यांविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली आहे. नवलानी यांनी आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, त्यांची पत्नी २४ जुलै रोजी मुलांसह दुबई येथून मुंबई विमानतळावर आली असता तिला विमानतळ प्राधिकरणाकडून थांबवण्यात आले व कोलकत्ता सीआयडीकडून त्यांना लूक आउट नोटीस बजावण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
दुसऱ्या दिवशी कोलकत्ता सीआयडीचे अधिकारी राजर्षी बॅनर्जी यांनी नवलानी यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन सहार पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर नवलानी यांनी त्यांचे नातेवाईक यांना सहार पोलीस ठाण्यात पत्नीच्या मदतीसाठी पाठवले. त्यावेळी नातेवाईक यांनी सीआयडी अधिकारी यांच्या सोबत बोलणी केली असता नवलानी यांची पत्नी भूमिकासह संपूर्ण कुटुंबांना अटक करण्यात येणार असल्याचे सीआयडी अधिका-याने सांगितले. त्यामुळे यातून सुटका करायची असल्यास, सीआयडी अधिका-याने १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप नवलानी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच, सीआयडी अधिका-यांनी एका वरिष्ठ अधिका-यांशी फोनवर बोलणे करून दिले, तसेच पत्नीवर कुठला गुन्हा आहे, त्याचा प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) मागितला असता अधिका-याने तो न देता यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि काही बड्या राजकीय नेत्याच्या सुचनेवरून ही कारवाई सुरू करत असल्याचे अधिका-याने सांगितले.
दरम्यान नवलानी यांच्यासोबत सीआयडी अधिका-याच्या मध्यस्थीसोबत वरळीतील एका हॉटेलमध्ये बैठक पार पडली व २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप नवलानी यांनी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात सीआयडी अधिकारी राजश्री बॅनर्जी, सुमित बॅनर्जी आणि संदीप दासगुप्ता व मोबाईल फोन वर बोलणारी व्यक्ती यांच्याविरुद्ध खंडणी आणि कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here