मुंबईत वाझे पार्ट-२ ! महिला पोलीस अधिकाऱ्यासह तिघांवर खंडणीचा गुन्हा

114

मुंबईतील एका महिला पोलीस अधिकारी आणि निलंबित पोलीस अधिकऱ्यासह तिघांविरुद्ध खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. शालिनी शर्मा, अनिल जाधव आणि राजू सोनटक्के असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण

शालिनी शर्मा या सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला पोलीस अधिकारी असून त्यांची नागपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसेच अनिल जाधव हा निलंबित पोलीस अधिकारी तर राजू सोनटक्के हा खासगी इसम आहे. शालिनी शर्मा चेंबूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्तीवर होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बढती मिळाली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये चेंबूर पोलीस ठाण्यात चेंबूर येथील एका व्यवसायिकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी वसीम याला अटक केली होती, इतर दोघानी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

या गुन्ह्यातील आरोपीच्या नातलगाकडे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा, निलंबित पोलीस अधिकारी अनिल जाधव यांनी खाजगी इसमाच्या मध्यस्थीने त्याला जामीन मिळवून देण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे दिले नाही तर तुरुंगातून बाहेर येऊ देणार नाही, अशी धमकी शर्मा यांच्या मार्फत जाधव याने दिली होती. जाधव याने आरोपीकडे ५० लाख दे नाहीतर मी ५० लाख तुला देतो चेंबूर मधील संपत्ती आईला सांगून माझ्या नावावर कर अशी धमकी देखील जाधव याने आरोपीला पोलीस कोठडीत असताना दिली असल्याची माहिती वसीम यांची वकील चित्रा साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितली.

(हेही वाचा – कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची होतेय फसवणूक!)

या प्रकरणी वकील चित्रा साळुंखे यांनी हे प्रकरण वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे घेऊन दाद मागीतली असता पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपवली होती. गुन्हे शाखा कक्ष ६ च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून कागदी पुरावे, तसेच तांत्रिक पुरावे गोळा करून या प्रकरणाचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे सोपवला असता, या अहवालात तसेच साक्षी पुराव्यावरून महिला पोलीस अधिकारी शालिनी शर्मा, निलंबित पोलीस अधिकारी अनिल जाधव आणि खासगी इसम राजू सोनटक्के हे दोषी आढळून आले. तसेच या प्रकरणात या तिघांनी एका राजकीय पुढाऱ्याच्या मदतीने खंडणीसाठी धमकी दिल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती वकील साळुंखे यांनी दिली.

राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सहभागाची शक्यता

गुरुवारी याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी शालिनी शर्मा, अनिल जाधव आणि राजू सोनटक्के यांच्याविरुद्ध खंडणी, धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली. या प्रकरणात आणखी पोलीस अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या नेत्याचा सहभाग असल्याची शक्यता फिर्यादी यांचे वकील चित्रा साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. या गुन्हाचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू आहे अशी महिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शालिनी शर्मा यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.