वाझे प्रकरणाचा धडा मुंबई पोलिसांनी घेतलाच नाही, खंडणीच्या गुन्ह्यात अडकले पोलीस अधिकारी

103

अँटिलिया प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलाला ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्याचे व्रण अजून भरलेले नाही, तोच मुंबई पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी दोन अधिकारी यांना अटक करण्यात आलेली असून या खंडणी प्रकरणात बडे अधिकारी देखील गुंतले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पो उपनिरीक्षक समाधान जमदाडे या तिघांवर जबरी चोरी, खंडणी, पदाचा गैरवापर करणे या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तिघांकडून अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर

दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात असलेल्या अंगाडीया यांना आयकर विभागाची भीती दाखवून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलिस निरीक्षक कदम आणि पोउनि. जमदाडे यांनी बेकायदेशीररित्या अटकाव करून त्यांची पोलीस ठाण्यात कुठेही नोंद न करता त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात येत असल्याची तक्रार अर्ज अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्याकडे आला होता. या अर्जाची चौकशी केली असता या तिघांनी आपल्या अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करून अंगाडीया यांच्याकडून जबरी चोरी करून खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी या तिघांविरुद्ध त्याच्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथक (सीआययु) कडे सोपवले आहे. सीआययुने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पो उपनिरीक्षक समाधान जमदाडे या दोघांना अटक केली आहे.

गुन्ह्यामुळे मुंबई पोलिसांची अधिकच छबी मलीन

प्रथमच अशा गंभीर गुन्ह्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी तक्रारदार झाले असल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात वरिष्ट दर्जाचे अधिकारी देखील सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी वाझे प्रकरणाने मुंबई पोलिसांची छबी खराब केलेली असताना लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात (एल.टी. मार्ग) दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे मुंबई पोलिसांची अधिकच छबी मलीन झाली आहे. मुंबई पोलीस दलात वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना, पोलीस दलातील खंडणीखोर अधिकारी यांना रोखण्यासाठी यापुढे पोलीस आयुक्तांकडून कुठले पाऊल उचलले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाझे प्रकरणानंतर पोलीस अधिकारी यांच्यावर दाखल झालेले गुन्हे
  • आंबोली पोलीस ठाण्यात पोलीस उपयुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकाविरुद्ध खंडणीसह कट रचणे, मारहाण करणे, खोटे दस्तवेज तयार करणे या संबधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील पोलीस उपायुक्त वर हा दुसरा गुन्हा असून यातील पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी बडतर्फ असून एनआयएच्या एका गुन्ह्यात तो तुरुंगात आहे. तर दुसरे पोलीस निरीक्षक मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. हा गुन्हा सप्टेंबर २०२१ मध्ये दाखल झाला होता.
  • चेंबूर पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ट पोलीस निरिक्षक आणि सध्या सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकारी शालिनी शर्मा या महिला अधिकारी , बडतर्फ पोलीस अधिकारी अनिल जाधव सह तिघांवर ३ फेब्रुवारी रोजी ५० लाख रुपयांची मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.