वीज बिल भरण्यासंबंधी खोटे मेसेज पाठवून लुबाडणूक करणाऱ्यांचे जामताडा कनेक्शन

164

सायबर गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे झारखंड राज्यातील जामताडा हे खेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईसह राज्यभरातील वीज ग्राहकांना येणारे फेक मेसेजस जामताडा येथून येत असल्याचे मुंबई पोलिसांच्या एका कारवाईत समोर आले आहे. मलबार हिल पोलिसांनी झारखंड येथून एकाला अटक केली असून मुख्य आरोपी हा जामताडा येथील असल्याचे अटकेत असलेल्या आरोपीच्या चौकशीत समोर आले आहे.

अशी होत होती फसवणूक

मागील काही महिन्यांपासून राज्यासह मुंबईतील वीज ग्राहकांच्या व्हाट्सॲप वर वीज बिला संदर्भात मेसेज पाठवून वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी मेसेजमध्ये दिली जात होती. या मेसेजमध्ये एक मोबाईल क्रमांक दिला जात होता व या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात येत होते. वीज ग्राहकांकडून या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याच्याकडून एक लिंक पाठवून लिंकवरुन क्विक सपोर्ट हे ॲप डाऊनलोड कारण्यास सांगितले जात होते. डाउनलोड केलेल्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन बील भरा, अन्यथा वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी धमकी दिली जात होती. क्विक सपोर्ट या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्यातून दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करून वीज ग्राहकांची फसवणूक केली जात होती. असाच एक प्रकार मलबार हिल येथे राहणाऱ्या एका गृहिणीच्या बाबतीत ३० जून रोजी घडला होता. या महिलेच्या बँक खात्यातून १ लाख ७३ हजार रुपये दुसऱ्या खात्यावर वळते करून फसवणूक करण्यात आली होती.

(हेही वाचा कोरोना काळात बक्कळ पैसा कमावणाऱ्या ‘डोलो-650’च्या मालकावर आयकर विभागाचे छापे)

लुबाडलेल्या पैशांतून मोबाईल खरेदी

याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पो.नि शुभदा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश बनकर, पो. अंमलदार कदम, धारवाडकर, बाजीराव संदे या पथकाकडून मनी ट्रेलचा तपास करण्यात आला. आरोपीने फसवणुकीचे पैसे क्रोमा गिफ्ट वाउचरमध्ये वर्ग केले होते. या वाउचरचा उपयोग करून मोबाईल फोन खरेदी करण्यात येत होते. हे मोबाईल फोन खरेदी करणाऱ्या एका आरोपीला कोपरखैरणे, नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. मदन जयलाल साव (३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा झारखंड राज्यातील असून सध्या नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहण्यास होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा जामताडा येथे राहणारा असून तेथूनच तो वीज बिलासंबंधी बोगस मेसेजेस पाठवून वीज ग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.