कोंबड्या खायला आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला

चंद्रपूरात भद्रावती येथील रामटेके वसाहतीमध्ये निरंजन चक्रवर्ती यांच्या घरातील कोंबड्या जोरजोराने ओरडू लागल्यानंतर त्यांच्या घरातील सदस्य जागे झाले. घराबाहेर कोंबड्यांसह बिबट्या दिसल्यावर या कुटुंबाने घराचे दार लावून घेतले. ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यातच कोंबडी खायला आलेला बिबट्या अडकला.

( हेही वाचा : ‘फॉक्सकॉन’ प्रकरणी तत्कालीन सरकारने काय केले, याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा – शेलार )

रामटेके वसाहतीतील चक्रवर्ती कुटुंबीयांनी घराबाहेर कोंबड्या पाळल्या होत्या. या कोंबड्यांना खाण्यासाठी साधारणतः साडेचारच्या सुमारास बिबट्या आला. बिबट्या आल्यामुळे कोंबड्या जोरजोरात ओरडू लागल्या. कोंबड्या ओरडू लागल्याने चक्रवर्ती कुटुंबातील सदस्य घराबाहेर आले. मात्र यावेळी प्रसंगावधानता बाळगून त्यांनी बिबट्याला घरात येऊ दिले नाही. बिबट्या स्वतःच पिंजऱ्यात अडकला होता. याबाबत माहिती मिळताच चंद्रपूर वनविभागाची वन्यप्राणी बचाव टीम सकाळी साडेसहाच्या सुमारास घटनास्थळी पोहोचली. बिबट्या अगोदरच पिंजऱ्यात अडकल्याने त्याला बेशुद्ध न करताच वनाधिका-यांनी जेरबंद केले. तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या कोंबड्यांपाठोपाठच पिंज-यात अडकला. वैद्यकीय चाचणीत बिबट्याला कोणतीच जखम आढळून आली नाही.

अखेर वनविभागाने अडीच वर्षांच्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. ही कारवाई चंद्रपूर वनविभागाचे (प्रादेशिक) विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत साहाय्यक वनसंरक्षक निकिता चौरे, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे वन्यप्राणी बचाव पथकाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, भद्रावती विभागाचे प्रादेशिक अधिकारी हरिदास शेंड्ये तसेच चंद्रपूर वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे यांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here