सध्या ऑनलाइनचा जमाना आहे, सर्वकाही ऑनलाइन उपलब्ध होत असताना कर्ज देणाऱ्या काही कथित कंपन्यांनी देखील आपले ऑनलाइन ॲप्लिकेशन तयार केले आहे. याद्वारे त्यांनी गरजवंतांना आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली आहे. कर्ज देणाऱ्या ऑनलाइन अप्लिकेशनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला असून आपल्या जाळ्यात अडकलेल्याकडून ‘पठाणी वसुली’ या कथित कंपन्यांच्या गुंडांनी सुरू केली आहे. या कंपन्यांच्या गुंडानी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा आर्थिक तसेच मानसिक छळ मांडला असून या गुंडाच्या छळाला कंटाळून मालाड पूर्व येथे एकावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तर वांद्रे पोलीस ठाण्यात एकाने एका कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
मालाड पूर्व येथे राहणारे दत्तगुरु कोरगावकर यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. दत्तगुरु यांचा लहान भाऊ संदीप कोरगावकर याने बुधवारी मालाड पूर्व कुरार व्हिलेज या ठिकाणी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. भाऊ दत्तगुरु यांनी कुरार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, भाऊ संदीप याला मागील काही महिन्यापासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कर्जाची रक्कम परत करण्यासाठी फोन येत होते, त्याने कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसतांना त्याला फोन करून धमकी देऊन त्याचा मानसिक छळ करण्यात येत होता, तसेच त्याच्या कामातील सहकारी, तसेच घराशेजारी राहणारे मित्र मैत्रिणीच्या मोबाईल फोनमधील व्हाट्सॲपवर संदीप याची बदनामी करणारे मेसेज येत होते.
संबंधितावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकरणी गेल्या महिन्यात कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात ‘हॅलो कॅश’ ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संदीप याला अश्लील मेसेज, अश्लील फोटो पाठविण्यात येत असल्याची तक्रार अर्ज देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर देखील संदीप याला कॉल करून त्याचा मानसिक छळ सुरू ठेवला अखेर या सर्व प्रकारामुळे संदीपने राहत्या घरात बुधवारी आत्महत्या केल्याचे भाऊ दत्तगुरू यांनी म्हटले आहे. याप्रकरणी कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मानसिक छळ करून वसुली केली सुरू
वांद्रे पश्चिम येथे राहणाऱ्या एका फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाने आपल्या मोबाईल फोन मध्ये ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ‘कॅश मार्केट’ आणि ‘मॅजिक लोन’ हे दोन ॲप्लिकेशन डाउनलोड केले होते, त्याने या दोन्ही अप्लिकेशनमधून प्रत्येकी तीन ते चार हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज परतफेड करण्याच्या तारखेच्या अगोदरच या कंपन्याच्या लोकांनी फोन करून बदनामी कारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याचा फोटो मोर्फ करून अश्लील फोटो लावून तो नातेवाईक आणि मित्राच्या मोबाईल फोनवर व्हायरल केल्याची तक्रार या तरुणाने केली आहे आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकारे ऑनलाइन लोन देणाऱ्या कंपन्यांनी अनेकांचा मानसिक छळ करून वसुली सुरू केली. ज्या व्यक्तीने कर्ज घेतले नाही त्यांना देखील या कंपनीचे गुंड प्रवृत्तीचे लोक फोन करून धमकी देत असल्याच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
Join Our WhatsApp Community