मुंबईत भवन आणि स्मारक बांधण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेकडून अजून एक भवन आणि स्मारक बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत राजर्षि शाहू महाराजांचे यथोचित स्मारक आणि कोल्हापूर भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी गिरगाव येथील कार्यक्रमात केली.
( हेही वाचा : जितेंद्र नवलानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल )
मुंबईतील गिरगांवातील खेतवाडी गल्ली क्रमांक १३ मध्ये उभारण्यात आलेल्या ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृतिस्तंभ’चे लोकार्पण राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार मालोजीराजे भोसले यांच्या मुख्य उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी समारंभपूर्वक करण्यात आले, यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली असून राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी भविष्यवेधी आणि सदा समाजाला पुढे नेण्याचा विचार करुन प्रत्येक कार्य केले. त्यांचे विचार आणि कार्य आजही उपयुक्त आहे. हे कार्य आणखी पुढे न्यायचे असल्याचे उद्गगार काढले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार अनिल देसाई, आमदार सुनिल शिंदे, डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, तसेच माजी नगरसेवक संपत ठाकूर, माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आणि इतर मान्यवर तसेच कोल्हापुरातून राजर्षि शाहू विचार जागर यात्रेसमवेत आलेले मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे आणि राजर्षि शाहू महाराज यांची मैत्री होती. या दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेणारे वारस म्हणून मी व आदित्य ठाकरे योगायोगाने येथे उपस्थित आहोत,असे माजी आमदार मालोजीराजे भोसले सांगितले. शाहू महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केलं. त्यांनी देशालाच नव्हे तर जगाला दिशा देणारा सामाजिक समतेचा पाया रचला, असे मालोजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृतिस्तंभ उभारण्याची संकल्पना
लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईतील गिरगाव येथील खेतवाडी गल्ली क्रमांक १३ मध्ये स्थित तत्कालीन ‘पन्हाळा लॉज’ या राजवाड्यात दिनांक ६ मे १९२२ रोजी निधन झाले. अंतिम समयी ‘मी जाण्यास तयार आहे, डर कुछ नहीं, सबको सलाम बोलो’ ही वाक्ये उच्चारल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराजांच्या निधनानंतर ही इमारत करवीर दरबारने १ लाख १० हजारांना फनिबंध या पारसी व्यक्तीला विकली. या राजवाड्याच्या ठिकाणी शाहू महाराजांचे स्मारक व्हावे, अशी भास्करराव जाधव यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नियोजन केले, मात्र, काही कारणाने अखेरपर्यंत स्मारक उभारले नाही. फनिबंध यांनी पुढे ही जागा एका पारशी ट्रस्टला विकली आणि आता कालांतराने तेथे एडुलाई नामक टोलेजंग इमारत उभी राहिली.
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे यंदा (२०२२) स्मृति शताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून तत्कालीन पन्हाळा लॉज ठिकाणी स्मृतिस्तंभ उभारावा, त्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न करावेत, या हेतूने काही महिन्यांपूर्वी माजी आमदार मालोजीराजे भोसले, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आदींनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज स्मृति स्तंभ उभारणीची कार्यवाही सुरु झाली.
असा आहे स्मृतिस्तंभ
महापालिकेच्यावतीने या स्मृतिस्तंभाची निर्मिती करण्यात आली आहे. स्तंभाची उंची १२ फूट असून त्याचा आराखडा तयार करण्यासाठी कोल्हापूरच्या सह्याद्री इतिहास संस्थेचे सहाय्य घेण्यात आले. हा स्मृतिस्तंभ बेसॉल्ट दगडापासून बनविण्यात आला आहे. त्यावर शाहू महाराजांची प्रतिमा आणि अखेरच्या क्षणी शाहू महाराजांनी उच्चारलेले वाक्य कोरण्यात आले आहे. गिरगाव येथे महानगरपालिकेच्यावतीने स्मृतिस्तंभाच्या पायाचे काम करण्यात आले. तर कोल्हापुरात केर्ली या गावी शिल्पकार ओंकार कोळेकर व कलाकार दीपक गवळी यांनी स्तंभ घडवला.