मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवीन मॉडेल! दहशतवाद्यांना पकडल्यावर आली जाग

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या पुन्हा रडारवर आली, त्यामुळे बुधवारी ताबडतोब मुंबईच्या लोकल सुरक्षा अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी कटाच्या मॉड्युलनंतर देशभरात विशेषतः मुंबईतील सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. कारण यामध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई लोकल होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या उच्च पदस्थांची बैठक झाली. त्यामध्ये मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवीन मॉडेल बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे समजते.

दहशतवाद्यांच्या रडारवर पुन्हा मुंबई लोकल! 

दहशतवाद्यांनी मुंबईत येऊन रेकी केल्याची माहिती आधी समोर आली, मात्र त्यानंतर राज्यातील एटीएसप्रमुख विनीत अग्रवाल यांनी ही माहिती फेटाळून लावत अशा प्रकारची रेकी करण्यात आली नाही, परंतु करणार होते, असे सांगितले. परंतु वस्तुस्थिती काहीही असली तरी दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई लोकल आली आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बुधवारी ताबडतोब मुंबईच्या लोकल सुरक्षा अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्यासह उच्च पदस्थांची बैठक झाली.

(हेही वाचा : दहशतवाद्यांचा कट : मुंबई रेल्वे स्थानकांची केलेली रेकी! गृहमंत्र्यांची उच्च स्तरीय बैठक)

सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे नव्याने परीक्षण!

या बैठकीत आता मुंबई लोकलच्या सुरक्षेच्या व्यवस्थेचे पुन्हा नव्याने परीक्षण करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेसाठी नवीन मॉडेल बनण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला सुरक्षेचाही विषय महत्वाचा असणार आहे. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाऊ शकते. तसेच सध्या महत्वाच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारांकडे मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे, त्यातील बरेचसे नादुरुस्त स्थितीत आहेत, अशा प्रकारच्या त्रुटी निर्माण होऊ नये, त्यादृष्टीने रेल्वे पोलिस गांभीर्याने विचार करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here