मुंबईतील मुंबई सेंट्रल येथील वॉक्हार्ट रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. तिस-या लाटेनंतर म्युकरमायकोसिस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यास आता सुरुवात होत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिली गेली. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राखा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
कोरोना काळात दुस-या लाटेच्या तडाख्यात म्युकरमायकोसिस या डोळ्याजवळ आढळणा-या बुरशीजन्य आजारामुळे कित्येक कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला होता. आताही काही म्युकरमायकोसिस बाधा झालेले रुग्ण सरकारी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या आजाराची बाधा होऊ नये म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी वेळेवर औषधे आणि योग्य आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
( हेही वाचा : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद! )
डिस्चार्ज देण्याचा विचार नाही
वोक्हार्ट रुग्णालयात दाखल झालेल्या ७० वर्षीय वृद्धाला ५ जानेवारी रोजी कोरोनाचे निदान झाले. कोरोनाचे निदान झाल्यापासून वृद्धाने मधुमेह नियंत्रणात राखण्याची औषधे खाणे बंद केले. परिणामी आठवड्याभरानंतर शरीरातील साखरेची मात्रा ५३२ पर्यंत पोहोचली. रुग्णाला तातडीने वॉक्हार्ट रुग्णालयात दाखल करावे लागले. साखरेची मात्रा नियंत्रणात राखण्यासाठी रुग्णावर तातडीने डॉक्टरांनी उपचार सुरु केले. रुग्ण दाखल झाल्यानंतर तिस-या दिवशी त्याच्या गालावर सूज आल्याचे इंटर्नल मेडिसीन विभागाचे डॉ. हनी साल्व्हा यांच्या लक्षात आले. ही सूज म्युकरमायकोसिसचे लक्षण असल्याने तातडीने त्यांनी रुग्णाला आवश्यक तपासण्या करण्याचे सांगितले. मात्र त्याअगोदरच रुग्णावर म्युकरमायकोसिस संबंधित औषधोपचार सुरु करण्यात आले. रुग्णात म्युकरमायकोसिसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. ही शस्त्रक्रिया करुन रुग्णाच्या शरीरात काळी बुरशीचा भाग काढून टाकण्यात आला. मात्र रुग्णाला एन्टीफंगल उपचार बराच काळ घ्यावा लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत असून, तूर्तास त्यांना डिस्चार्ज देण्याचा विचार नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून दिली गेली.
Join Our WhatsApp Community