नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथे एका पोलीस अधिकाऱ्याने अपंग प्रेस कामगाराला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेलरोड येथील नवरंग कॉलनीमध्ये राहणारे दत्तात्रेय डमाळे हे त्यांच्या सायकलवर मिठाई आणण्यासाठी गेले असता पाठीमागून पोलीसांची वर्दी परिधान केलेल्या एका अनोळखी पोलिसाने त्यांना जोरदार धडक दिली. यात दत्तात्रय डमाळे हे रस्त्यावर पडून जखमी झाले.
अपंग कामगाराला बेदम मारहाण
दोघांची धडक झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि जखमी डमाळे यांनी त्या पोलिसाला “गाडी थोडी हळू चालवा” असे सांगितले असता, त्या पोलीस कर्मचाऱ्याला या गोष्टीचा राग आला आणि त्याने डमाळे यांना वाईट-साईट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तू माझं काहीही करू शकत नाही, मी पोलीस आहे” असा दम देऊन रस्त्यावर पाडून डमाळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
( हेही वाचा: जगाच्या उष्ण शहरांच्या यादीत चंद्रपूर पाचव्या दिवशी पडले मागे… पाहा कोण आहे आघाडीवर …)
काय कारवाई होणार?
परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी केली असता त्यांना सुद्धा शिवीगाळ करून तेथून तो पोलीस निघून गेला. या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अद्याप समजलेले नाही. अपंग वृद्ध प्रेस कामगार यांना औषध उपचारासाठी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वर्दीची गुर्मी असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस आयुक्त दीपक पांडेय काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community