दिल्ली एनसीआरमधून 40 लक्झरी कार चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हाॅलिवूड सिनेमाची सीरिज द फास्ट अॅन्ड फ्युरिअसने प्रेरित होऊन तीन लोकांनी दिल्ली एनसीआरमध्ये चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या 40 लक्झरी कार चोरी करण्यासाठी त्यांनी जीपीएस जॅमर, स्कॅनर आणि रिमोट कंट्रोल कार्ससहित अनेक गॅजेट्सचा वापर केला. चोरी केल्यानंतर गाड्या जास्त किमतीत विकल्या जात होत्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोळीतील एक उत्तर प्रदेशच्या मेरठचा राहणारा आहे. तो रवि उत्तम नगर गॅंगचा सदस्य आहे.
‘द फास्ट अॅन्ड फ्युरिअस’ ने प्रेरित
आरोपी हाॅलिवूड सिनेमा ‘द फास्ट अॅन्ड फ्युरिअस’ ने प्रेरित असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज सी यांनी दिली. या चोरट्यांनी कार अनलाॅक करण्यासाठी स्कॅनरचा वापर केला आणि नंतर कारमधील जीपीएस निष्क्रिय करण्यासाठी जॅमरचा वापर केला. आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तुलसोबतच सेंसर किट, चुंबक, एलएनटी चाव्या आणि आठ रिमोट कारच्या चाव्या जप्त केल्या आहेत.
( हेही वाचा: म्हाडाच्या घरांची सोडत लांबणीवर? हे आहे कारण )
अशी करत होते चोरी
एक साॅफ्टवेअर हॅकिंग डिवाइसचा वापर करुन त्यांनी आधी कार अनलाॅक केल्या. त्यानंतर कारचे साॅफ्टवेअर फाॅर्मेट करुन डिवाइसच्या मदतीने नवीन साॅफ्टवेअर टाकले. नवीन चाव्या तयार केल्या आणि त्यांनी दोन ते तीन मिनिटांमध्ये कार चोरी केली. चोरी केलेल्या या कार त्या सोसायटींमध्ये पार्क केल्या जात होत्या जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि त्यानंतर या कार राजस्थान आणि मेरठला जास्त किंमतीत विकत होते. या आरोपींनी एप्रिल महिन्यापासून उत्तम नगर, तिलक नगर, सुभाष नगर, पश्चिम विहार, मुनिरका आणि द्वारका येथून 40 कार्सची चोरी केली.
Join Our WhatsApp Community