नाशिकमध्येही ‘पुष्पा’ पण वनविभागच निघालं ‘फायर’!

115

रक्तचंदनाच्या छोट्या बाहुल्या तयार करत विक्रीस ठेवलेल्या नाशिक पंचवटीतील दुकानदार पुष्पाला सोमवारी वनविभागाने बेड्या ठोकल्या. या पुष्पाने छोट्या बाहुल्यांमार्फत औषधी वापराकरता रक्तचंदनाची अवैध विक्री सुरु ठेवली होती. या धाडीत मृत वन्यजीवांचे अवेशषही जादूटोणा आणि औषधी वापराकरिता अवैधरितीने विकले जात होते.
ही कारवाई नाशिक वनविभागाच्या मदतीने राज्यात तस्करी आणि अवैध विक्री रोखण्यासाठी तयार झालेल्या विशेष तपास पथकाकडून केली गेली. या कारवाईतील दुकानदार आरोपी कैलास पुळकेला सांगली कोर्टात मंगळवारी सायंकाळी हजर करण्यात आले. सांगलीत चार महिन्यांपूर्वी वनविभागाने टाकलेल्या धाडीत अटक केलेल्या, आरोपीने नाशिकमध्येही मृत वन्यप्राण्यांच्या अवशेषांची विक्री होत असल्याची माहिती दिली होती.

काय आहे प्रकरण

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सातारा, सांगली आणि कोल्हापूरात वनविभागाने धडकसत्र राबवले. या धडकसत्रात ११ गुन्हे दाखल झाले, मात्र यातील काही आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाल्याने वनविभागातूनच कोणातरी आरोपींना टीप दिल्याची बोंबाबोंब झाली. मात्र उरलेल्या आरोपींनाही नंतर जामीन मिळाला. या प्रकरणातील तपासयंत्रणा सक्षम करण्यासाठी वनविभागाने विशेष तपासणी पथक तयार केले. या तपासणीत आरोपींनी नाशिकमध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष विकले जात असल्याची माहिती दिली.

वनविभागाच्या सायबर सेलने आरोपींचे ठिकाण शोधले

मोबाईल नंबरच्या नोंदीतील तपशील तसेच ट्रेसिंगवरुन आरोपी शोधण्याचे काम अमरावतीमधील वनविभागाची सायबर सेल टीम करत होती. मात्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील कारवायानंतर आरोपींनी चार महिन्यांपासून मोबाईल बंद ठेवला होता. काही दिवसांपूर्वीच आरोपींचा नंबर पुन्हा सुरु झाला. सायबर सेलला आरोपींचे मोबाईल रॅकोर्ड करायची गृह मंत्रालयाकडून परवानगी असल्याने, आरोपींचे बोलणे रॅकोर्ड होत गेले. शिवाय विक्रीच्या ठिकाणाची तपशीलवार माहिती मिळाली.

कसे राबवले धडकसत्र?

वनविभागातील एक अधिकारी व एक वन्यजीवप्रेमी बनावट ग्राहक बनून नाशिक येथील पचंवटीतील इंद्रकुंड भागांतील लक्ष्मी पूजा साहित्य भांडारात गेले. वन्यप्राण्यांच्या अवशेषांची मागणी करताच दुकानदाराने त्या वस्तू आणून दिल्या तेच वनविभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत इंद्रजाल (प्रवाळ), रेड सी फॅन, हत्ताजोडी (घोरपडीचे गुप्तांग) असा वन्यजीव प्रतिबंधित माल सापडला. यावेळी रक्तचंदनाचे १० नगही सापडले.  या आरोपीला सांगलीतील कोर्टात हजर केले जाणार आहे.

नाशिक कारवाईतील तीन आरोपी पळाले

नाशकातील पंचवटीतील कारवाई यशस्वीरित्या पार पडली असली, तरीही नानगाव येथील समोरे गावात वनाधिका-यांना गावक-यांनीच अडवले. या शाब्दिक वादात तीन आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले.

( हेही वाचा: महाराष्ट्र बंद का केला सांगा, उच्च न्यायालयाचा सरकारला अल्टिमेटम! )

वन्यजीव अवशेष का चोरतात

  • प्रवाळ – प्रवाळाचा उपयोग प्रवाळभस्म नावाचे आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी केला जातो. प्रवाळ हे वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ या संरक्षित यादीत पहिल्या वर्गवारीत सुरक्षित केले जात आहे.
  • हत्ता जोडी (घोरपडीचे गुप्तांग) – जादूटोण्यासाठी वापरले जाते
  • सी फॅन – घरात सी फॅन ठेवताच आर्थिक भरभराट होते, असा समज आहे.
  • रक्तचंदनही विकता येत नाही – जंगलातील पशूपक्ष्यांप्रमाणेच वनसंपदेला धक्का पोहोचवणा-या वृक्षांच्या कत्तलींविरोधातही वनविभाग कारवाई करते. भारतात रक्तचंदन दक्षिण भारतातील घनदाट जंगलात आढळून येते. कायद्याने रक्तचंदनाची विक्री करता येत नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.