लाखो फॉलोअर्स असलेला सोशल मीडिया स्टार निघाला घरफोड्या चोर

186

टिकटॉक आणि युट्युब स्टार अभिमन्यू गुप्ताला घरफोडीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांच्या विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून घरफोडीसाठी लागणारे साहित्य आणि चोरीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. लाखो फॉलोअर्स असणाऱ्या अभिमन्यू गुप्ता याच्यावर मुंबईसह आसपासच्या शहरात २० पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असून त्याची एक खासियत म्हणजे चोरी करताना तो ज्या घरात चोरी करतो त्या घराच्या बाहेर असलेले चप्पल, बूट देखील चोरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र तो चोरलेल्या चप्पल, बुटांचे करतो काय याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.

( हेही वाचा : NSSच्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट; जाणून घेतली क्रांतिकारकांची यशोगाथा)

अभिमन्यू गुप्ता हा ३० वर्षांचा असून तो पूर्वी कुर्ला बैल बाजार या ठिकाणी राहत होता. त्यानंतर तो ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे राहण्यास गेला आणि आता तो कुर्ला नेहरूनगर येथ राहत आहे. कुर्ला पूर्व ख्रिश्चन गाव या ठिकाणी राहणाऱ्या ६० वर्षीय मीरा सिमरैया या १७ आणि १८ मे रोजी घरी नसताना त्यांच्या घरी चोरी झाली होती. त्यांच्या घराचे कडी कोयंडे तोडून घरातील २६९ग्रॅम सोन्याचे दागिने, १ किलो ३४१ ग्रॅम चांदीचे दागिने आणि ९ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि धृतराज, पोलीस उपनिरीक्षक पदमाकर पाटील आणि पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात एक संशयित पोलिसांना दिसून आला.

तपास पथकाने या संशयिताच्या अधिक माहिती मिळविण्यास सुरुवात केली असता संशयित व्यक्ती टिकटॉक आणि युट्युबवर प्रसिद्ध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी युट्युब आणि टिकटॉक तसेच इतर सोशल प्लॅटफार्म तपासले असता त्यात पोलिसांना भेटलेला संशयित इसम तोच असल्याची खात्री झाली. पोलिसांनी त्याचा शोध घेत असताना २४ मे रोजी तो विद्याविहार येथील किरोळ गाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे घरफोडीचे साहित्य आणि चांदीचे दागिने मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याला अटक करण्यात अली असून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्याच्यावर मुंबईसह मिरा रोड, ठाणे येथे २० पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

…तो चपलाही चोरायचा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिमन्यूची एक खास बात आहे. तो ज्या घरी चोरी करायला जातो त्या घराच्या बाहेर असलेले चप्पल बूट देखील चोरी करतो. पोलीस त्याच्या घरी झडतीसाठी गेले असता त्याच्या घराबाहेर जुन्या चप्पल बुटांनी भरलेल्या चार ते पाच गोण्या आढळून आल्या. तसेच त्याने पायात घातलेली चप्पल तो दरवेळी चोरी करताना घालतो, त्याचे असे म्हणणे आहे की, ज्या दिवशी ही चप्पल मी घालून निघतो त्या दिवशी मला माझ्या कामात यश मिळते. मात्र तो घराबाहेर असलेल्या चप्पला का चोरतो याबाबत त्याने पोलिसांना काहीही माहिती दिलेली नाही.

अभिमन्यू गुप्ता हा मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर सक्रीय असून टिकटॉक, युट्युबसह इतर सोशल प्लॅटफार्मवर तो फेमस असून त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. चोरीच्या पैशातून तो मौजमजा करतो तसेच पैसे मैत्रिणीवर उडवतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.