मिलन सबवेचा परिसर यंदाच्या पावसाळ्यात राहणार कोरडा?

167

मुसळधार पावसात अंधेरी परिसरातील ‘मिलन सबवे’ लगतच्या परिसरात पाण्याचा निचरा अत्यंत संथ गतीने होतो.‌ यावर पर्यायी उपाययोजना म्हणून मिलन सबवे लगत असणाऱ्या महापालिकेच्या एका भूखंडावर तब्बल दोन कोटी लिटर क्षमतेचे ‘साठवण जलाशय’ उभारण्यात येत आहे. या साठवण जलाशयाचे काम प्रगतीपथावर असून येत्या पावसाळ्यात याचा उपयोग होण्यास सुरुवात होणार असल्याचा विश्वास अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी आशिष शर्मा यांची नियुक्ती)

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पश्चिम उपनगरांमध्ये प्रगतीपथावर असलेल्या महानगरपालिकेच्या विविध प्रकल्प कामांची पाहणी केली, तसेच कामांच्या अंमलबजावणीचा व प्रगतीचा एकंदर आढावा घेतला. तसेच पश्चिम उपनगरांमधील नालेसफाई कामांचीही त्यांनी मंगळवारी पाहणी केली.

मंगळवारी या पाहणी दौऱ्याच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्तांनी या साठवण जलाशयाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला व या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पाहणी केली. निर्धारित वेळापत्रकानुसार या साठवण जलाशयाची जी कामे येत्या पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित आहे, ती कामे निर्धारित वेळापत्रकानुसारच पूर्ण करावीत, असे निर्देश पी. वेलरासू यांनी याप्रसंगी पर्जन्य जलवाहिन्या खात्याला दिले आहेत.

अंधेरी पूर्व परिसरातील नवीन उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर

अंधेरी पूर्व परिसरात असणाऱ्या तेली गल्ली पासून ते गोखले उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्यावरून नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हा पूल ५७० मीटर लांब व १७ मीटर रुंदीचा असणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामांचा आढावा अतिरिक्त आयुक्तांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान घेतला.

आरे कॉलनीतील पर्यावरण पूरक विकास

पर्यावरणपूरक विकासाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या गोरेगावातील दिनकरराव देसाई मार्गासह (आरे कॉलनी मार्ग) परिसरातील विविध रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. विशेष म्हणजे या परिसरात असणाऱ्या वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडणे सुलभ व्हावे, यासाठी वनखात्याच्या सल्ल्यानुसार रस्त्याच्या खालून वन्य प्राण्यांसाठी स्वतंत्र मार्गिकांची व्यवस्था देखील या प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे. तसेच एकही झाड न कापता करण्यात येत असलेल्या या प्रकल्प कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पाहणी केली.

या सर्व कामांच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी मंगळवारी पाहणी दौऱ्याच्या अखेरीस दिली आहे.

या पाहणी दौऱ्यादरम्यान ‘परिमंडळ ७’ च्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मिस्त्री, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागांचे व खात्यांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पाहणी दौ-यादरम्यान पी. वेलरासू यांनी ज्या प्रकल्प कामांची व नालेसफाई कामांची पाहणी केली व कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.