वारणसीच्या ज्ञानवापी मशिदीचा वाद कोर्टात सुरू असतानाच कर्नाटकातील मंगळुरूच्या एका मशिदीच्या खाली हिंदू मंदिरांसारखी स्थापत्य रचना सापडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे.
विश्व हिंदू परिषदेने केला दावा
यासंदर्भातील माहितीनुसार मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाल मार्केट परिसरात ही मशीद आहे. या मशिदीच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. त्यावेळी इथे एक हिंदू मंदिरासारखी स्थापत्य रचना आढळून आली आहे. मशीद बांधण्यापूर्वी मंदिर अस्तित्वात होते, असा दावा विश्व हिंदू परिषदेने केला असून कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे. तर, जिल्हा प्रशासनाने दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
(हेही वाचा – पुण्यातही ‘ज्ञानवापी?’; मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा)
ज्ञानवापी मशिदीवरून वाद चिघळला
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद चिघळला आहे. याठिकाणी मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. तर मुस्लीम समुदायाने प्रार्थनास्थळांसंबंधीत कायद्याचा उल्लेख केला आहे. कोणत्याही प्रार्थनास्थळांचे दुसऱ्या प्रार्थनास्थळांमध्ये रुपांतर करू नये, असा हा कायदा होता. पण, वाराणसी न्यायालयाने मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप मुस्लीम संघटनांनी केला आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.
Join Our WhatsApp Community