देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना काही ठिकाणी गालबोट लागण्याचे प्रकारही पाहायला मिळाले. असाच एक भयंकर प्रकार छत्तीसगढमधून समोर आला आहे. छत्तीसगढच्या कोरियामध्ये फटाके फोडताना एक विचित्र घटना घडली आहे. फटाके फोडताना केलेला जिवघेणा प्रयोग एका १६ वर्षीय मुलाच्या जिवावर बेतल्याचे समोर आले आहे.
काय घडला प्रकार
या १६ वर्षीय मुलाने सुतळी बॉम्ब स्टीलच्या ग्लासमध्ये ठेवून तो पेटवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने त्याच्या आजुबाजुला विटा लावल्या आणि सुतळी बॉम्ब ग्लासात पेटवून त्यावरही वीट ठेवली. हा बॉम्ब फुटताच स्टीलच्या ग्लासाचे तुकडे झालेत आणि त्यातील एक तुकडा मुलाच्या छातीवर उडाला आणि तो शरिरात घुसला आणि त्याचा मृत्यू झाला.
(हेही वाचा – हातात वॉश बेसिन घेऊन एलन मस्क थेट ट्विटरच्या ऑफिसात! Video व्हायरल)
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाचे नाव जगत सिंह असे असून हा मुलगा त्याच्या नातेवाईंकाकडे राहत होता. त्याच्या आईचे निधन झाले असून त्याचे वडील घरीच असतात. दिवाळीला तो त्याच्या मित्रांसह फटाके फोडण्यासाठी गेला होता. यावेळी मस्ती करताना त्याने स्टीलच्या ग्लासात बॉम्ब ठेवून पेटवला, अशी माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली.
बॉम्ब पेटवताना जगतला तेथून पळ काढण्यास संधी मिळाली नाही. ग्लास बॉम्ब फुटला आणि जगतला मोठी इजा झाली. यावेळी तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला त्वरीत उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला अती रक्तस्त्राव झाल्याने मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोस्टमार्टेममध्ये त्याच्या शरीरातून ग्लासचे तुकडे काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community