झोमॅटो या हॉटेलचं अन्न घरपोच पोहोचवणाऱ्या सेवेतील एक डिलिव्हरी बॉयचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात सिग्नलवर थांबला असताना हा मुलगा एक पार्सल फोडून फ्रेंच फ्राईज खाताना दिसतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक ग्राहकांनी आपले असेच अनुभव शेअर केले आहेत. बंगळुरू शहरात झोमॅटो कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय ग्राहकांसाठी असलेलं अन्नाचं पार्सल फोडून स्वत: ते फस्त करताना एका व्हिडिओत टिपला गेला आहे. हा मुलगा तेव्हा शहरात एका सिग्नलवर थांबला होता. रविवारी दुपारच्या वेळेस काढलेला हा व्हिडिओ म्हणता म्हणता व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत हा डिलिव्हरी बॉय सिग्नलवर थांबला आहे. थोडा वेळ गेल्यावर तो त्याच्या स्कूटरच्या मागच्या सीटवर ठेवलेला अन्नपदार्थांनी भरलेला बॉक्स उघडतो. आणि एका छोट्या खोक्यातून फ्रेंच फ्राईज खाताना दिसतो. या व्हिडिओमुळे झोमॅटो किंवा स्विगी सागख्या अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. ग्राहकांचं अन्न सुरक्षित ठेवण्यात कंपन्या अपयशी ठरत असल्याची लोकांची प्रतिक्रिया आहे. फेसबुक या समाज माध्यमावर हा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी आपल्या असाच अनुभव आल्याचं खाली प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे.
एकाने म्हटलंय की, ‘हॉटेल मालकांनी अन्न नीट पॅक केलं जातंय की नाही, हे पाहायला हवं.’ तर आणखी एकानं लिहिलंय की, ‘असं अनेकदा होतं. आणि याविषयी आम्ही वारंवार तक्रारही केली आहे.पण, झोमॅटोनं कधीच त्यांची दखल घेतली नाही.’ गंमत म्हणजे हे घडलं तेव्हा झोमॅटो कंपनीचे मालक दीपिंदर गोयल आपल्याशी संलग्न डिलिव्हरी बॉयज् ना फ्रेंडशिप बँड वाटत होते. रविवार ५ ऑगस्ट हा जागतिक मैत्री दिवस होता. आणि त्याचं औचित्य साधून गोयल यांनी आपल्या काही डिलिव्हरी बॉयज् ना फ्रेंडशिप बँड वाटले. त्याचा व्हिडिओही त्यांनी ट्विटरवर शेअर केला होता.
Going to deliver some food and friendship bands to our delivery partners, restaurant partners and customers. Best Sunday ever!! pic.twitter.com/WzRgsxKeMX
— Deepinder Goyal (@deepigoyal) August 6, 2023
(हेही वाचा – Mulund : मुलुंड परिसरात लंगूरला विजेचा धक्का)
झोमॅटो आणि स्विगी कंपन्यांकडे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेविषयी तक्रारी काही नवीन नाहीत. आणि असे व्हिडिओ व्हायरल होण्याचीही ही पहिली वेळ नाही. अलीकडेच एक व्हिडिओ असाही व्हायरल झाला होता ज्यात डिलिव्हरी बॉयने ग्राहकांची अन्नाची पाकीटं जपून ठेवली आहेत आणि तो स्वत: प्लास्टिकच्या पिशवीत बांधून आणलेला आमटी-भात खात आहे. डिलिव्हरी बॉयज् चं काम हे गिग (Gig Economy) तलं काम धरलं जातं. ही नियमित नोकरी नाही. आणि इथं कामाची सुरक्षितताही नाही. एका डिलिव्हरीचे या मुलांना २० तो ४० रुपये मिळतात. त्यामानाने गर्दी आणि पावसातून वाट काढत करावा लागणारा प्रवास जिकिरीचा असतो. त्यामुळे डिलिव्हरी बॉयज् ना कामाची सुरक्षितता कशी मिळणार आणि त्यांचा योग्य मोबदला किती यावरही या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community