अबुधाबी येथून मुंबईकडे उड्डाण केलेल्या विमानात एका इटालियन नागरीक असलेल्या महिलेने विमानातील केबिन क्रु-मेम्बरसोबत गैरवर्तन करत विमानात विवस्त्र होऊन गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.
पाओला पेरुसिओ (४५) असे या इटालियन नागरिक असलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबी येथून रविवारी मुंबईकडे रवाना झालेल्या विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून इटालियन नागरिक असलेली पाओला पेरुसीओ ही प्रवास करीत होती. सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ती अचानक जागेवरून उठली आणि बिझनेस क्लासमध्ये जाऊन बसली. विमानातील केबिन क्रूचे दोन महिला कर्मचारी तिच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या, तिला काही मदत हवी आहे का? याबाबत चौकशी करीत होत्या व तीला तिच्या जागेवर जाऊन बसण्यासाठी विनंती करू लागल्या.
महिला प्रवासी अटकेत
दरम्यान या इटालियन प्रवासी महिला केबिन क्रु-मेम्बर असलेल्या महिलांच्या अंगावर धावून गेली व एकीच्या अंगावर थुंकली. तिच्या गैरवर्तणुकीमुळे तिला रोखण्याच्या प्रयत्न करताच इटालियन महिला पूर्णपणे विवस्त्र होऊन विमानात धावू लागली. अखेरीस पहाटे साडेचार वाजता विमान मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर या महिलेला आवर घालून महिला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी सहार पोलिसांनी या महिला प्रवासी विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community