कथित ऑनलाइन लोन अॅप्लिकेशन कंपनीने केलेल्या बदनामीला कंटाळून एका तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी मालाडच्या कुरार व्हिलेज पोलिसांनी राजस्थानमधून एकाला अटक केली आहे. राजू खडाव (२५)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशात शेकडोच्या संख्येने ऑनलाइन लोन अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहेत, हे लोन अॅप्लिकेशन अँड्रॉइड मोबाईलच्या ‘प्ले स्टोर्स वर उपलब्ध आहेत, झटपट कर्ज, कमी व्याजदर,सुलभ ईएमआय देण्याची जाहिराती समाज माध्यमावर करून या लोन कंपन्या गरजवंतांना आपल्या जाळ्यात ओढतात.
समाज माध्यमांवर बदनामी केली जाते
५ हजारांपासून ते लाखो रुपयांचे ऑनलाइन कर्ज दिल्यानंतर, काही आठवड्यातच या कंपन्यांच्या प्रतिनिधीकडून फोन करून संबंधित कर्जदारांकडे वसुलीसाठी तगादा लावला जातो व कर्जदाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैशांची मागणी केली जाते, पैसे भरूनदेखील या लोन कंपन्यांचे प्रतिनिधी वसुलीसाठी कर्जदारांना वारंवार मानसिक त्रास देऊन समाज माध्यमांवर तसेच नातेवाईक, मित्रमंडळींना बदनामी कारक मेसेज पाठवले जातात, या मेसेजमध्ये कर्जदाराचा फोटो मोर्फ करून त्याला अश्लील फोटो लावला जातो.
आरोपीची चौकशी सुरु
अशाच बदनामीला कंटाळून मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथील संदीप कोरगावकर या तरुणाने काही आठवड्यापूर्वी आत्महत्या केली होती. याप्रकरणी कुरार व्हिलेज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कुरार व्हिलेज पोलिसांनी तांत्रिक तपास करून राजस्थान राज्यातील एका खेड्यातून राजू खडाव याला अटक केली आहे. राजू खडाव याला मुंबईत आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
( हेही वाचा: राज ठाकरेंना हिंदुत्वाकडून भाषिक मुद्दयाकडे वळवण्याचा डाव )
गृहविभागाकडून गंभीर दखल
कुरार व्हिलेज प्रकरणानंतर ऑनलाइन लोन अॅप्लिकेशनचा मुद्दा ऐरणीवर येताच या कंपन्यांकडून होत असलेल्या जाचा संदर्भात मुंबईसह राज्यभरातील पोलीस ठाण्यामध्ये शेकडोच्या संख्येने तक्रारी दाखल झाल्याचे, धक्कादायक वास्तव्य समोर आल्यानंतर, गृहविभागाने याची गंभीर दखल घेत, मुंबईसह महाराष्ट्र सायबर विभागाला या कथित लोन अँप्लिकेशन वर कारवाईचे आदेश दिले गेले. महाराष्ट्र सायबर विभागाने गेल्या आठवड्यात सायबर एक्सपर्ट याची मदत घेऊन २० लोन अप्लिकेशन कंपनीची यादी तयार करून, अॅड्रॉइड प्लॅटफर्मवरील प्ले स्टोर्स आणि गुगलला ही यादी पाठवून हे अॅप्लिकेशन हटवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community