‘किस’ करून चोऱ्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. या चोरट्याने काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व या ठिकाणी एका एटीएम सेंटरमध्ये वकील महिलेला किस करून तिची रोकड पळवली होती. अंधेरी पोलिसांनी या चोरट्याला नालासोपारा येथून अटक केली आहे.
महिलांना विचलित करायचा
अविनाश कासार (२९) या चोरट्याचे नाव आहे. नालासोपारा या ठिकाणी राहणारा हा सराईत चोरटा एकट्या दुकट्या महिलेला, तरुणींना गाठून त्यांना किस करून त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या हातातील मोबाईल, पर्स घेऊन पळून जात होता. अंधेरी पूर्वेत १९ जानेवारी रोजी पेशाने वकील असणारी २६ वर्षीय महिला बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एकटीच पैसे काढण्यासाठी गेली होती, अविनाश हा तिच्या पाठोपाठ एटीएम सेंटरमध्ये आला व तिने पैसे काढल्याचे बघताच त्याने तिच्या पाठीवर हळूच आपले ओठ टेकवून किस केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळलेल्या या वकील महिलेला काही क्षणासाठी काही सुचले नाही आणि अविनाश या चोरट्याने संधी मिळताच तिच्या हातातील रोकड आणि तिचे एटीएम कार्ड घेऊन पळून गेला.
( हेही वाचा : बापरे…कोरोना महामारीत २११ पोलीस लाचखोरीच्या जाळ्यात! )
सराईत चोरट्याला अटक
या प्रकरणी या वकील महिलेने अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, पोलिसांनी विनयभंग आणि चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि काही तांत्रिक तपासावरून वरिष्ठ पोलिस निरिक्षक संताजी घोरपडे, तसेच पोलिस निरिक्षक शिवाजी पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उप निरीक्षक दिगंबर पगार, राजेंद्र पेडणेकर, हेमंत सुर्यवंशी, प्रविण जाधव, अविनाश कापसे, सागर सोनजे, विजयानंद लोंढे, विजय मोरे, विषाल पिसाळ या पथकाने नालासोपारा येथून या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली. त्याने चोरलेल्या एटीएम कार्डवरून सुमारे १२ वेळा व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अविनाश कासार याला अटक करून चौकशी केली असता तो किस करण्याची पद्धत वापरून चोरी करीत असल्याची त्याने कबुली दिली आहे.
Join Our WhatsApp Community