मला न्याय द्या! खासदार राहुल शेवाळेंवर आरोप करणा-या तरुणीचे मुख्यमंत्र्याना पत्र

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने न्यायासाठी थेट मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले आहे. या पत्राद्वारे तरुणीने मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागितला आहे. तसेच, हे पत्र तिने ट्विट केले आहे. साकिनाका पोलिसांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या तक्रारीवरून नुकताच या तरुणीवर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. आता या तरुणीने थेट मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागितला आहे.
मूळच्या दिल्ली येथील ३३ वर्षीय तरुणीने शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. तीने तसे एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. या पत्रात तिने खासदार शेवाळे यांनी मला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचे म्हटले आहे. राहुल शेवाळे हे राजकारणी असल्यामुळे ते आपल्या पदाचा वापर करून माझ्यावर दबाब आणून माझ्यावर खोटे आरोप करत आहेत, असे तिने पत्रात म्हटले आहे.
काय म्हटलेय पत्रात
मी एप्रिल महिन्यात साकिनाका पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेली असताना, पोलिसांनी केवळ जबाब लिहून घेतला, मात्र गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर शेवाळे यांनी न्यायालयात माझ्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल केली असून, न्यायालयाच्या आदेशावरून साकिनाका पोलीस ठाण्यात माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, तिने पत्रात म्हटले आहे.
राहुल शेवाळे यांनी राजकीय संबंध वापरून दुबईत माझ्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला. ऑक्टोबर २०२१ मध्ये मला शारजाहमध्ये अटक करण्यात आली, तेव्हा मला धक्का बसला. मला ७८ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले आणि माझा छळ करण्यात आला, पण शारजाहमध्ये मला न्याय मिळाला आणि मी खटला जिंकले आणि न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली.

( हेही वाचा: शिवसेनेच्या बारा खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट )

राहुल शेवाळे यांनी माझी व्यावसायिक विश्वासार्हता गमावली. गेल्या ११ वर्षांतील दुबईतील माझी कारकीर्द उद्ध्वस्त केली, माझे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, तर मला अपमानित केले गेले असे या तरुणीने पत्रात म्हटले असून, मला न्याय मिळाला नाही तर माझ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे तिने मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या तरुणीने हे पत्र ट्विटरवर देखील टाकले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here