‘आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांची माफी मागावी’ – आशिष शेलार

पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईतील नालेसफाईची 35 टक्केच झाली असून प्रशासन जी आकडेवारी देत आहे ते खोटी आहे, असा घणाघाती आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे. 25 वर्षांच्या सत्तेनंतर मुंबईकरांना सुरक्षेची हमी देऊ शकत नसतील तर आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांची माफी मागावी, अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

( हेही वाचा : महानगरपालिकेची पावसाळी नियोजनासाठी विशेष बैठक )

भाजपा नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या नगरसेवकांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील पाहणी दौरा केला. मालाड येथील वलनाई, जूहु येथील एसएनडीटी तर कुर्ला येथील मिलिंद नगर नाल्यांवर जाऊन कामाची पाहणी करण्यात आली. तिन्ही ठिकाणी भयावह चित्र असून नाल्यामध्ये गाळाचे ढिगारे तसेच पहायला मिळत असून या दौऱ्यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेऊन निवेदनासह मुंबईतील नाल्यांचा सचित्र अहवाल सादर केला. त्यानंतर महापालिका मुख्यालयातील भाजपा पक्ष कार्यालयात बैठक घेऊन आमदार आशिष शेलार यांनी या संपूर्ण दौऱ्याची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात, पूर्ण होऊ शकतात, नियोजन होऊ शकते, अशा गोष्टी सुद्धा पालिका प्रशासन जाणून-बुजून करताना दिसत नाही. टाळाटाळ केली जाते आहे हा कुठला कट आहे?

आम्ही जेव्हा 7 एप्रिलला नालेसफाईची पाहणी करायला उतरलो त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेकडून आमच्या या पाहणी दौऱ्यावर टीका करण्यात आली, मात्र ते स्वतः तेव्हाही फरार होते आणि आजही फरार आहेत. काल जेव्हा दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याचे नियोजन आम्ही सुरू केले त्यानंतर संध्याकाळी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी अंधारात जाऊन नालेसफाईची पाहणी केली. “उजेडात होते पुण्य अंधारात पाप” या गाण्याच्या ओळीची आठवण करून देत हे कसले अंधारात पाप सुरू आहे? असा खोचक सवाल त्यांनी केला. आम्ही आज पालिका आयुक्तांना भेटणार असे कळताच पालकमंत्र्यांनी धावाधाव करून आयुक्तांना भेटून गेले. एवढे दिवस हे कोठे होते? असा सवालही आमदार अँड शेलार यांनी केला. मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून महापालिकेतील सत्ताधारी फरार आहेत आणि मुंबईतील नालेसफाईचे चित्र मात्र अत्यंत भयावह आहे काठावर पास व्हावे त्याप्रमाणे नालेसफाईची केवळ 35 टक्केच कामे झाली आहेत त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात मुंबईकर सुरक्षित नाहीत मुंबईकरांच्या मालमत्ता सुरक्षित नाहीत आणि याला जबाबदार महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना आहे

मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यापूर्वी बैठक घेतली त्या बैठकीत काय ठरले त्यानंतर कामाचे नियोजन का केले नाही ? आता पाऊस तोंडावर आल्यावर पालकमंत्र्यांची धावपळ सुरू आहे एकूणच मुंबईकडे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष नाही मुंबईकर असुरक्षित आहेत असे चित्र पाहायला मिळते आहे.

पावसाळ्यापूर्वी करावी लागणारी वृक्ष छाटणी अद्याप झालेली नाही, दरडी कोसळणे झाडं कोसळणे, मोडकळीस आलेल्या इमारती याबाबतचे नियोजन करण्यात आलेले नाही आज याबाबत बैठक झाली असे पालिका आयुक्तांनी सांगितले हे सर्व पाहता पालिका प्रशासनाचा निद्रानाश कसा होणार आणि कधी होणार ? हाच एक प्रश्न आहे. मुंबईमध्ये पावसाळ्यात जी परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासनाची दिरंगाई आणि सत्ताधारी शिवसेनेचे पळ काढू धोरण जबाबदार असेल असेही आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. मुंबईचा बाप कोण ?मुंबई कुणाची? अशी भाषणे करता, मग आता मुंबईकरांसाठी रस्त्यावर का उतरत नाही? पंचतारांकित हाँटेलमधील बैठका, पार्ट्या सोडून कधीतरी रस्त्यावर उतरुन प्रत्यक्ष परिस्थितीची आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत का? असा सवालही आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांची माफी मागावी!

येत्या पावसाळ्यात मुंबईकर सुरक्षित असतील याची हमी देता येणार नाही, अशा आशयाचे विधान आदित्य ठाकरे यांनी केले त्यावर पत्रकारांंनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मुंबईची 25 वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जर आदित्य ठाकरे असे म्हणत असतील तर त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी.

आता कुठले ट्रेनिंग?

आज पालिका आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की, वृक्ष छाटणी बाबत पालिका आता उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणार आहे. जर पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष छाटणीची ट्रेनिंग होणार असेल तर मग छाटणी कधी करणार? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here