मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील एकूण रुग्णशय्या क्षमता आता २५ हजारापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून जगभरात जे-जे चांगलं आहे, ते मुंबईसाठी आणू, असा आशावाद राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. सातत्याने ताणतणावाचा सामना करुन वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर मंडळींसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मनोरंजन केंद्र उभारण्यात येईल आणि या केंद्रामध्ये योगा आणि तत्सम सर्व सुविधा पुरविल्या जातील, अशी घोषणाही आदित्य ठाकरे यांनी कुपर रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी केली.
( हेही वाचा : मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर पुन्हा अलर्टवर )
मुंबई ही जगाची आरोग्य राजधानी व्हावी
विलेपार्ले पश्चिम येथील मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. रु. न. कूपर रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी समारंभपूर्वक करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोविड कालावधीतील मुंबई महानगरपालिकेच्या कामगिरीचे ‘मुंबई मॉडेल’ संपूर्ण जगाच्या कौतुकास पात्र ठरले. शिक्षण, पाणी, आरोग्य यासारख्या नागरी सेवा-सुविधा स्वस्त आणि मस्त पद्धतीने पुरविणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील कदाचित एकमेव महानगरपालिका असावी की जिचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. मुंबईत जे-जे करु ते जगात सर्वोत्तम ठरावे, हा आमचा ध्यास असून मुंबई ही जगाची आरोग्य राजधानी व्हावी, हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई उपनगरासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचेच समर्पक नाव या महाविद्यालयाला दिले गेले. ४० महिन्यांच्या कालावधीत बांधून ही इमारत पूर्ण करण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाची नवीन वास्तू अनेक आधुनिक व सुसज्ज सेवा-सुविधांनी युक्त आहे. आज या इमारतीत १३ विभाग सुरु होत आहेत. भविष्याची गरज लक्षात घेता, ही संख्या ४० पर्यंत वाढवणे देखील शक्य आहे. एवढेच नव्हे तर, सुपरस्पेशालिटी व एक्सलन्स सेंटरही या ठिकाणी आणण्याचा विचार आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एम.बी.बी.एस. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं बांधली जात आहेत. मुली व मुलींच्या वसतिगृहांच्या दोन्ही इमारती पूर्णत्वाकडे जात असल्याचेही काकाणी यांनी नमूद केले.
याप्रसंगी राज्याचे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, परिवहन व संसदीय कार्ये मंत्री ऍड. अनिल परब, स्थानिक खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सुनील शिंदे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (परिमंडळ ४) विजय बालमवार, कूपर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, के/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. माजी आमदार अशोक जाधव, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशोधर फणसे, माजी नगरसेवक राजू पेडणेकर, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) सुधीर गजरगावकर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) चक्रधर कांडलकर, मनपा वास्तुशास्रज्ञ सुरेंद्र बोराळे, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ, विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार, आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाचे उप प्रमुख अभियंता रवींद्र घुले तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र घाटे, पाडुरंग चव्हाण, घोराडे यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी, अभियंते, वैद्यकीय विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community