बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी ‘आरे’त स्वच्छता अभियान!

125

आरेच्या विविध भागांमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी मुक्त जनावरांचा संचारही वाढला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्थानिक जनतेबरोबरच येणारे पर्यटकही कचरा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. बिबट्याचा वावर या अशा ठिकाणी वाढत असल्याचे आढळून येत असून आरेचा परिसर कचरामुक्त करण्यासाठी करण्यासाठी २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त सकाळी ८ वाजल्यापासून आरेमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून यात आरेतील सर्व जनतेने तसेच सेवाभावी संस्थेने उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन स्थानिक जनतेने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी उपस्थित जनतेला केले आहे.

आरे कॉलनी दिंडोशी, बिंबीसार, एस.आर.पी.एफ याठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. बिबट्याच्या वावराबाबत आरेतील अनेक ठिकाणांची पाहणी केली असता अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य, कचऱ्यांचे ढिग, या कचऱ्यामध्ये अन्न पदार्थांच्या शोधात येणारी कुत्री, डुक्कर, गायी, म्हशी, कोंबड्या इत्यादी प्राण्यांचा वावर आढळून आला. त्यामुळे बिबट्या प्राणी भक्षाच्या शोधात मानवी वस्तीत येतात व भक्ष्य समजून मानवांवर हल्ले करत असल्याने, यावर उपाययोजना करण्यासाठी उप वनसंरक्षक, ठाणे वनविभाग कार्यालयाने गुरूवारी आरेमध्ये बैठक बोलावली होती.

( हेही वाचा : शासन निर्णयाला आठ दिवस उलटले, तरी दुकानांवरील इंग्रजाळलेल्या पाट्या तशाच! )

स्थानिकांना आवाहन

आपण ज्या ठिकाणी राहतो तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवणे, ही स्थानिक जनतेची जबाबदारी आहे. या वस्त्यांमधून जमणारा दैनंदिन कचरा मनपाने उचलला पाहिजे. बिबट्याचा मानवी वस्तीवरील वावर कमी करण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ५६ ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा, वायकर यांनी यावेळी केली. या मोहिमेत स्थानिक रहिवाशांबरोबर सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही वायकर यांनी यावेळी केले.

कचरा व्यवस्थापन

बैठकीच्या सुरूवातीला सह वनसंरक्षक (ठाणे) गिरीजा देसाई यांनी, एनपॉवर फाऊंडेशन या संस्थेकडून आरेमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५६ ठिकाणी कचऱ्याचे ढिग व २७ पाड्यांमध्ये स्ट्रीट लाईटचा अभाव असल्याचे आढळून आल्याची माहिती दिली. तर मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त संगीत हसनाळे यांनी आरेमधून दरदिवशी १८ मेट्रीक टन कचरा गोळा होतो. यात १६ मेट्रीक टन कचरा हा ओला असतो व २ मेट्रीक टन कचरा हा सुका असतो. आरेतील आदिवासी पाडे हे लांब लांब असल्याने तेथील कचरा हा दरदिवशी उचलला जात नाही त्याचबरोबर यापुढे वस्त्यांमध्ये ई-वाहनांच्या माध्यमातून कचरा उचलण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे येथील रहिवाशांना मनपा तर्फे तीन डबे देण्यात येणार आहेत. यात निळा, हिरवा व काळ्या रंगाच्या डब्याचा समावेश आहे.

( हेही वाचा : अरेरे…महाराष्ट्रातील ‘या’ गावात आठवडाभर दिवसा वीज येतच नाही! )

बिबट्याच्या हल्ल्यातील ४ गंभीर जखमींना सव्वा लाखांच्या मदतीचा चेक

बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आरेतील चार जणांना उप वनसंरक्षक, ठाणे वनविभाग यांच्यातर्फे सव्वा लाख रुपयांचा चेक आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते देण्यात आला. यात निर्मला देवी सिंग (आरे डेअरी जवळ), आयुष यादव (युनिट ३), राजेश प्रेमसिंग रावत (संतोष नगर), दर्शन सतु कुमार सिंह (युनिट १३) यांना या चेकचे वाटप करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.