प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंत्रालयात बैठकीसाठी गेलेल्या सरकारी रुग्णालयातील प्राध्यापकांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केलेल्या प्रकरणाला आठवडा उलटला तरीही सरकारी पातळीवर कोणताही कारवाई झालेली नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण खाते चालवते कोण, असा प्रश्न डॉक्टरांच्या विविध संघटना विचारत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि प्रधान सचिव सौरभ विजय यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना आता चांगलेच उधाण आले आहे. सोमवारी एमबीबीएसच्या नव्या बॅचचे एकाही शिक्षकांनी व्याख्यान घेतले नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, करिअरचा प्रश्न गंभीर होत असतानाही सरकारी पातळीवर शिक्षकांची दखल का घेतली जात नाही, असा सवाल वैद्यकीय शिक्षण संघटनांनी उपस्थित केला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांतील कंत्राटी स्वरुपात काम करणा-या शिक्षकांना कायमस्वरुपी केले जावे यासाठी गेल्या २८ दिवसांपासून संप करणा-या शिक्षकांच्या मागण्यांकडे सातत्याने डावलले जात असल्याने वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या करिअरची मोठी हेळसांड सुरु आहे. आज कोणत्याही राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएसच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचे लेक्चर सुरु झाले नाही. मागण्या अपूर्ण राहिल्यास या विद्यार्थ्यांच्या गाईड मिळण्यासाठी आवश्यक पत्रावर आम्ही स्वाक्षरी करणार नाही तसेच एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या परिक्षाही घेणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सचिन मुलकुटवार यांनी दिला.
आज प्राध्यापकांच्या आंदोलनाच्या तीव्रतेची कल्पना असल्याने जेजे अधिष्ठातांकडून अगोदरच अधिष्ठाता भाषण रद्द केले गेले. मिरज आणि धुळ्यात पालक आणि विद्यार्थी कित्येक तास अधिष्ठातांच्या भाषणाने सुरु होणा-या पहिल्या दिवसाची वाट पाहत होते.
आमचे भविष्य अंधारात
एमबीबीएची वर्ष पूर्ण केल्यानंतर शेवटच्या वर्षातील शोधनिबंधावर प्राध्यापक सही करायला तयार नाहीत. कायमस्वरुपी प्राध्यापकही सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे शोधनिबंधावर स्वाक्षरी होत नसल्याने आमच्या पदव्युत्तर शिक्षणाला ग्रहण लागले आहे. अगोदरच गेली दोन वर्ष कोरोनाच्या अत्यावश्यक रुग्णसेवेत मूळ अभ्यासाच्या विषयावर काम करायला डॉक्टरांना वेळ फारच कमी मिळाला. प्रत्येक लाटेत विद्यार्थी डॉक्टर्सही झोकून काम करत होते. आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मोठा प्रश्न उभा राहिला आहे, असे डॉ अविनाश दहिफळे, अध्यक्ष, मार्ड यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community