मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात नवीमुंबई पोलीस आयुक्तलयातील लिपीकाचा मृत्यू झाला, तर तीन पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कफ परेड पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे.
( हेही वाचा : ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम )
अपघातामध्ये एकाचा मृत्यू
दक्षिण मुंबईतील कफ परेड येथे मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका मोटारीने गेट क्रमांक ४ येथे पादचारी आसिफ अहमद शेख यांना धडक दिली. त्यानंतर गेट क्रमांक ६ येथे तिघांना धडक दिली. या अपघातामध्ये पायी जाणारे पादचारी प्रसेनजित गौतम धाडसे (३६), यांचा मृत्यू झाला असून नितेश कुमार मंडल(४३) आणि सुजय कुमार विश्वास (३५) हे जखमी झाले आहेत.
प्रसेनजीत धाडसे हे नवी मुंबई पोलीस आयुक्तलयात लिपिक होते, ते मॅटच्या कार्यालयातून सीएसएमटी रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघाले होते. जखमी नितेश हे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे अधिकारी असून दुसरे जखमी सुजय हे एसबीआय कॅपिटचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर जमलेल्या जमावाने मोटार चालक मुकुंद सिंग याला मोटारीतून बाहेर काढून घटनास्थळी दाखल झालेल्या कफ परेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कफ परेड पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community